दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणीपुरवठा?   

पुणेकरांसाठी केवळ ७.१५ टीएमसी पाणी उपलब्ध 

पुणे : राज्य सरकार आणि जिल्ह्यातील मंत्र्यांसह भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पुणेकरांना पाण्याच्या बाबतीत मोठा दणका दिला आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेसाठी अवघा १३.५ टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे, या मंजूर कोट्यातील ६.३५ टीएमसी पाणी आतापर्यंत वापरण्यात आले आहे. त्यामुळे ३० जून २०२७ पर्यंत पुणेकरांसाठी केवळ ७.१५ टीएमसी पाणी उपलब्ध राहणार आहे. वाढती लोकसंख्या आणि शहराची पाण्याची गरज लक्षात घेता हा साठा अत्यंत अपुरा ठरणार आहे. परिणामी, दिवाळीनंतर पुणेकरांना एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
 
कालवा समितीच्या बैठकीत अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता, ऑगस्ट आणि सप्टेंबरमधील अपुरा पाऊस तसेच रब्बी हंगामासाठी धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी या बाबींचा विचार करण्यात आला. राज्यातील दोनशेहून अधिक तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत २० टक्के पाणीकपातीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार पुणे महापालिकेने गेल्या तीन आठवड्यांपासून शहरात पाणीकपात लागू करून दहा टक्के बचतीचे नियोजन केले आहे.
 
बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्र्यांनी पुणे शहरासाठी १३.५ टीएमसी पाणी कोटा मंजूर केल्याची घोषणा केली. मात्र, हा कोटा संपूर्ण वर्षासाठी असल्याचे आणि त्यातील मोठा हिस्सा आधीच वापरला गेल्याचे स्पष्ट करण्यात आले नाही. जलसंपदा विभाग आणि महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबरपर्यंत ६.३५ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आठ महिन्यांसाठी केवळ ७.१५ टीएमसी पाणी शिल्लक आहे.
 
महापालिकेत नव्याने गावे समाविष्ट झाल्यानंतर पुण्यासाठी दरवर्षी १६.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर करण्यात आला होता. मात्र, शहराची लोकसंख्या आता सुमारे ८० लाखांवर पोहोचली आहे. महापालिकेला दरमहा सुमारे १.६५ टीएमसी पाण्याची गरज असून, वार्षिक गरज २० टीएमसीपेक्षा अधिक आहे. त्या तुलनेत मंजूर झालेला १३.५ टीएमसी कोटा अत्यंत अपुरा आहे. सध्या शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये सुमारे २४ टीएमसी पाणीसाठा असला, तरी त्यातून शेती, ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गरज, बाष्पीभवन आणि गळती यांचाही विचार करावा लागणार आहे.
 
या बैठकीत महापालिकेच्या पाणीपुरवठ्याबाबत काही मुद्दे मांडण्यात आले. मात्र, पाणीपुरवठ्यातील त्रुटी आणि पाणीबिलांच्या वसुलीचा मुद्दा उपस्थित करून मंत्र्यांनी महापालिकेला जाब विचारल्याचे समजते. धक्कादायक बाब म्हणजे, पाण्याचा प्रश्न गंभीर असतानाही बैठकीला उपस्थित असलेल्या एकाही लोकप्रतिनिधीने मंजूर कोट्याबाबत ठोस आक्षेप नोंदविल्याची माहिती समोर आलेली नाही.
 

Related Articles