मातीचा ढिगारा कोसळून कामगार ठार   

पुणे-सोलापूर महामार्गावरील दुर्घटना

पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील राजवडी येथे एका उड्डाणपुलाजवळ संरक्षण भिंतीचे बांधकामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत एक कामगार ठार झाला असून, दुसरा जखमी झाला आहे, अशी माहिती पोलिस अधिकार्‍यांनी दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
 
मशरूबल शेख (वय २५) असे मृत कामगाराचे नाव असूून, नरीम रियाज उद्दीन अख्तर (वय ३०) हा जखमी झाला आहे. ते दोघेही मूळचे पश्चिम बंगालमधील रहिवासी आहेत. राजवडी उड्डाणपुलाजवळ राष्ट्रीय महामार्गालगत संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू होते. घटनास्थळी सहा मजूर उपस्थित होते. त्यापैकी तिघे चहा पिण्यासाठी गेले होते. तर उर्वरित तिघे बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. याचवेळी अचानक माती आणि मुरुमाचा मोठा ढिगारा कोसळला. यात दोन कारगार अडकले. तिसर्‍या मजुराने प्रसंगावधान राखून स्वतःची सुटका केली आणि इतर सहकार्‍यांना घटनेची माहिती दिली. 
 
या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, पोलिस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. एका कामगाराला ढिगार्‍याबाहेर काढण्यात यश आले. त्याला उपचारासाठी इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुसर्‍या कामगाराचा ढिगार्‍याखाली अडकल्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच, घटनेची सखोल चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घटनास्थळी भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. 
 

Related Articles