बाजारात टोमॅटोचा सुकाळ; तुलनेने मागणी मात्र कमी   

पुणे : मागील काही दिवसांपासून बाजारात एकाच वेळी सर्व ठिकाणांहून टोमॅटोची आवक होत आहे. मात्र आवकेच्या तुलनेत मागणी नसल्यामुळे दरात मोठी घसरण झाली आहे. घाऊक बाजारात दर्जानुसार किलोला ८ ते १० रूपये दर मिळत आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत बाजारात टोमॅटोचा सुकाळ पाहायला मिळत आहे. 
 
विशेष म्हणजेे स्थानिक बाजारपेठेसह परराज्यात टोमॅटोला उठाव नाही. परिणामी, सर्वच फळभाज्यांना चांगला दर मिळत असताना टोमॅटोला मात्र कवडीमोल दर मिळत आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे मिळणार्‍या दरातून उत्पादन खर्चासह वाहतूक खर्च निघणे अवघड झाले आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलोला २० ते २५ रुपये दर मिळत आहे. 
 
घाऊक बाजारात पुणे जिल्ह्यासह सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक या भागातून आवक होत आहे. बाजारात रोज सुमारे ७ ते ८ हजार कॅरेटची आवक होत आहे. ही आवक नेहमीच्या तुलनेतच अधिक आहे. पुण्यातून  बाजारातून राज्यासह परराज्यातील बाजारात टोमॅटो विक्रीसाठी जात असतो. मात्र, विविध जिल्ह्यांसह परराज्यातही टोमॅटोचे पीक चांगले आले आहे. त्यामुळे आवकेच्या तुलनेत उठाव कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दर कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिक आणि खानावळीवाल्यांकडून टोमॅटोची खरेदी अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. ही एकमेव समाधानकारक बाब आहे. घरगुती ग्राहकांकडून नेहमीच्या प्रमाणातच मागणी असल्याचे ज्येष्ठ आडतदार विलास भुजबळ यांनी सांगितले.  

परिस्थिती अशीच असेल 

राज्यासह परराज्यात एकाच वेळी टोमॅटो काढणीला आला आहे. त्यामुळे आवकेच्या तुलनेत मालाला उठाव कमी आहे. परिणामी, कवडीमोल दर मिळत आहे. पुढील २० ते २५ दिवस बाजारात हीच परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे.
 
- अमोल घुले, अध्यक्ष, श्री शारदा गजानन आडते असोसिएशन.
 

Related Articles