महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड   

१८ हजार कर्मचार्‍यांना मिळणार बोनस; रकमेत दरवर्षी दोन हजारांनी वाढ

पुणे :  महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार असून, दिवाळीपूर्वी १८ हजार कर्मचार्‍यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा होणार आहे. विशेष म्हणजे दरवर्षी बोनसच्या रकमेत प्रत्येकी दोन हजार रुपयांची वाढ होणार असून, हा लाभ पाच वर्षांसाठी असणार आहे. हा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी शुक्रवारी दिली. या प्रस्तावाला स्थायी समिती, मुख्यसभा आणि प्रशासकीय समितीची मंजुरी आवश्यक आहे.
 
यंदा २७ हजार रुपये अतिरिक्त रक्कम मिळणार असून, २०२९-३० पर्यंत ती ३५ हजार रुपयांवर पोहोचेल. त्याचबरोबर नवीन भरती झालेल्या कर्मचार्‍यांसाठी एक वर्ष सेवा पूर्ण करण्याची अट शिथिल करून १८० दिवस प्रत्यक्ष काम केल्यास बोनस देण्याचा निर्णय प्रस्तावित असल्याचे नागपुरे यांनी सांगितले. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी, रोजंदारी कामगार, माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षण मंडळातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच बालवाडी शिक्षिका आणि सेविकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. २०२५-२६ ते २०२९-३० या पाच आर्थिक वर्षांसाठी सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांच्या एकत्रित रकमेच्या ८.३३ टक्के अनुदानासोबत अतिरिक्त रक्कम दिली जाणार आहे.
 

Related Articles