E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
सातारा
विदेश
क्रीडा
संपादकीय
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अक्षर दीपावली
संपादकीय
यशाला नामुष्कीची किनार (अग्रलेख)
Samruddhi Dhayagude
31 Oct 2026
पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ हे सुशिक्षित मतदारांचे प्रतिनिधित्व करतात. अलीकडच्या स्पर्धा परीक्षेतील गैरव्यवहार, भरती प्रक्रियेतील गोंधळ, रोजगाराच्या संधी आणि शैक्षणिक प्रश्नांबद्दल तरुणांमध्ये असलेली खदखद मतदानातून व्यक्त झाली असण्याची शक्यता आहे.
देशभरात झालेल्या विधान परिषद शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काही अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. एकूण २८ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या नागपूर आणि वाराणशीमध्येच पक्षाला पराभव पत्करावा लागला, तर काँग्रेसने कशीबशी एक जागा जिंकत पक्षाची पत राखली. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यातील या निवडणुकीत काँग्रेसच्या दृष्टीने कर्नाटकातील पराभव जिव्हारी लागणारा ठरला. तेथे काँग्रेसची सत्ता असूनही पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशात सहा, बिहार आणि कर्नाटकात ३ आणि महाराष्ट्रात एका जागेवर विजय मिळाला. उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची कामगिरी भारतीय जनता पक्षा खालोखाल सरस ठरली. तेथे त्या पक्षाला पाच जागा मिळाल्या. बिहारमध्ये जनसुराज पक्ष १, राजद १ आणि २ अपक्षांनी बाजी मारली. नागपुरात भाजपचे वर्चस्व असतानाही १ जागा काँग्रेसने खेचून आणली. या निवडणुकीच्या निकालाकडे पाहताना राजकीय पक्षांची संघटनात्मक ताकद, मतदारांशी असलेला संपर्क, मित्र पक्षातील समन्वय, उमेदवारांची निवड आणि विरोधकांना मिळणार्या संधी याचाही विचार करावा लागेल. राष्ट्रीय स्तरावर भाजपप्रणीत आघाडीचे वर्चस्व दिसत असले तरी महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यातील अंतर्गत कुरघोडीचे राजकारणही समोर आले आहे. त्यावरुन आता दोन्ही पक्षात वादंग सुरु झाले आहे. कर्नाटकातील काँग्रेसचा पराभव पक्षाच्या संघटनात्मक क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतो. एकूण १६ जागा जिंकणार्या भाजप आघाडीचे निकालात वर्चस्व दिसत असले तरी प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती वेगवेगळी आहे.
आत्मपरीक्षणाची संधी
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने दोन, तर काँग्रेसने १ अशा तीन जागा मिळवल्या. नागपुरात भाजपच्या उमेदवाराचा दुसर्या क्रमांकाची मते हेतुतः टाळून जाणीवपूर्वक पराभव केला गेला की, तो अनावधानाने झाला याचे आत्मपरीक्षण पक्षाला करावे लागेल. पारंपरिक बालेकिल्ल्यातील आत्मविश्वासाचा अतिरेक पक्षाच्या पराभवाचे कारण ठरला. नागपूर आणि पुणे हे भाजपचे प्रभावक्षेत्र असूनही तेथे पक्षाला पराभवास सामोरे जावे लागले. उमेदवारांच्या निवडीवरून असलेल्या पक्षांतर्गत नाराजीचा फटका भाजपला बसला आहे. स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता केलेली उमेदवाराची निवडदेखील पराभवाचे कारण ठरली. महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागा वाटपावरून मित्र पक्षात झालेल्या कुरबुरी आणि कार्यकर्त्यांनी पक्षादेश डावलून केलेला विरोधी उमेदवाराचा प्रचार यातून अधिकृत उमेदवार पराभूत झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार निवडून आले. त्यातून या पक्षाला आगामी काळात कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याची संधी मिळणार आहे. नागपूरमधील विजय काँग्रेससाठी प्रतीकात्मकदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपचे प्रमुख नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या परिसरात भाजपचा पराभव हा त्या पक्षाच्या दृष्टीने नामुष्कीचा आणि राजकीय बदलाचा संदेश देणारा निकाल आहे. काँग्रेसने मिळवलेला एकमेव विजय हा पक्षाला उभारी घेण्याचा संदेश देणारा ठरतो. काँग्रेसने या विजयाचा उपयोग पक्ष संघटन अधिक मजबूत करणे, तरुणांचे प्रश्न हाती घेणे आणि आघाडीतील मित्र पक्षांशी समन्वय साधून पक्ष अधिक बळकट करणे यासाठी करावयास हवा. उत्तर प्रदेशात भाजपने वर्चस्व राखले असले तरी समाजवादी पक्षाने आपला प्रभाव टिकवून ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांसाठी हा निकाल संघटनात्मक तयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो.
Related
Articles
निर्देशांकात काहीशी वाढ
09 Nov 2026
दूरदृष्टीचे संपादक
06 Nov 2026
पीएलएच्या दहशतवाद्याला अटक
07 Nov 2026
कोलंबियातील लष्करी तळावर ड्रोन हल्ला
09 Nov 2026
पंजाबमधील ‘आप’चे तीन बंडखोर आमदार भाजपमध्ये
03 Nov 2026
१५ वर्षांपासून रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाला गती
09 Nov 2026
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
किरणोत्सर्गाचे संदेश खोटे; युक्रेन-रशियाकडून स्पष्ट
2
‘अलौकिक’च्या स्नेहमेळाव्यात परिचारिकांचा सन्मान
3
पतीसह सासू-सासर्यांच्या पोलिस कोठडीत वाढ
4
संघाचे कार्यकर्ते,’निर्मल वारी’चे प्रवर्तक संदीप जाधव यांचे निधन
5
शहरे ही आर्थिक विकासाची केंद्रे - पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
6
पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करणारा उपायुक्त निलंबित