सिंहस्थ-श्रद्धा व भक्तीचा संगम   

बी. आर. कश्यप

आज (शनिवार) पासून नाशिक येथे सिंहस्थ कुंभ मेळ्याला प्रारंभ होत आहे. यातील पहिले शाही स्नान २३ ऑगस्ट २०२७ रोजी तर दुसरे अमृत स्नान ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होत आहे. त्यानिमित्त...
 
श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेल्या कुंभपर्वास गोदावरी तीरी म्हणजे नासिक-त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणाने आरंभ होत आहे. कुंभमेळा हा जगातील एक प्रमुख धार्मिक सोहळा समजला जातो. त्याला केवळ धर्म वा अध्यात्माचा संदर्भ नाही; तर प्राचीन भारतीय संस्कृतीच्या गौरवशाली परंपरेचे तो प्रतीक आहे. भारतीय-विशेषतः हिंदू समाजाची विचारसरणी, जीवनपद्धती, धार्मिक श्रद्धा, आचारधर्म आणि एकूणच सामाजिक मूल्ये या कुंभमेळ्यात प्रतिमित होत असतात. त्यामुळेच तर कुंभमेळ्याविषयी केवळ भारतातच नव्हे, तर कुतूहल व आदराची भावना संपूर्ण जगातही आहे.
 
कुंभमेळा हा भारतातील सर्वांत प्राचीन धार्मिक सोहळा असल्याने त्याच्याविषयी अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार, समुद्रमंथनातून प्राप्त झालेला अमृताचा कुंभ इंद्राचा पुत्र जयंत हा स्वर्गात घेऊन जात असताना त्यातील अमृताचे काही थेंब हरिद्वार, प्रयागराज (अलाहाबाद), नासिक-त्र्यंबकेश्वर आणि उज्जैन येथे अनुक्रमे गंगा, गंगा-यमुना संगम, गोदावरी आणि क्षिप्रा या नद्यांच्या पात्रात पडले. त्यामुळे त्या विशिष्ट ग्रहस्थितीत या प्रत्येक ठिकाणी स्नान केल्यास पापक्षालनाबरोबरच पुण्यसंचयही होतो, अशी श्रद्धा आहे.
 
कुंभमेळा आरंभ होतो तेव्हा गुरू हा मुख्यत्वे कुंभ राशीत असतो आणि सूर्य व चंद्र विशिष्ट स्थितीत असतात. एका राशीत एक वर्ष या नियमानुसार गुरू दर बारा वर्षांनी सिंह राशीत येतो तेव्हा नासिकमध्ये सिंहस्थ पर्वाला आरंभ होतो. गुरू सिंह राशीचा नसतो, तेव्हा सिंहस्थ नसते. यंदा गुरू सिंह राशीचा असल्याने नासिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आहे. त्याला आधार आहे तो या श्लोकाचा. 
 
सिंहे गुरूस्थानेस्तथाभानुः चंद्रश्चंद्रक्षयस्तथा |
गोदावर्या भवेत कुंभ 
जायातेऽवनि मण्डले ॥
 
नासिकमध्ये या पर्वकाळाला सिंहस्थ हा शब्द प्रचलित असला, तरी इतरत्र मात्र त्याला कुंभमेळा असेच सर्वसाधारणपणे म्हटले जाते. गुरू मकर राशीत असतो तेव्हा हरिद्वारमध्ये, मिथुन राशीत असतो तेव्हा प्रयागराज (अलाहबाद) मध्ये आणि मेष राशीत असतो तेव्हा उज्जैनमध्ये कुंभमेळा भरतो. दर बारा वर्षांनी भरणारा हा मेळा पूर्ण कुंभ, तीन वर्षांनी कुंभ आणि सहा वर्षांनी अर्धकुंभ म्हणून ओळखला जातो. याशिवाय बारा पूर्ण कुंभमेळ्यांनंतर (१४४ वर्षांनंतर) प्रयागराज येथे महाकुंभमेळा संपन्न होतो.
 
नाशिक येथील सिंहस्थ महत्त्वपूर्ण मानला जातो. नाशिक हे चारही युगात प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावले होते, हे त्याचे कारण. या काळात त्याची नावे अनेकवार बदलत गेली. सभोवताली घनदाट जंगल असलेला हा भूप्रदेश दंडकारण्य म्हणून आरंभी ओळखला जात असे. गोदावरीच्या काठावर वसला असल्याने त्याला गोदाक्षेत्र म्हणून नाव मिळाले. नंतर त्याला त्रिकंटक व जनस्थान ही नावे मिळाली. अर्थात त्यामागे पौराणिक कथांचे संदर्भ हे आहेतच. रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक लक्ष्मणाने येथे कापल्याने त्याला नासिक हे नाव प्राप्त झाले.आजमितीला हेच नाव प्रचलित आहे. नासिकला कृतयुगात पद्मनगर, त्रेतायुगात त्रिकंटक, द्वापारयुगात जनस्थान आणि कलियुगात नासिक ही नावे दिली गेली. याशिवाय मोगल राजवटीतही नाशिकचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला गेला. येथील निसर्गसौंदर्य, आल्हाददायक वातावरण व शांत परिसर पाहून औरंगजेब बादशहाने त्याचे गुलशनाबाद असे नामकरण केले.
 
नाशिकला जशी दीर्घकालीन ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे, तशीच समृद्ध धार्मिक व आध्यात्मिक परंपराही लाभली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे नासिक भारतातील पाच प्रमुख महातीर्थांपैकी एक गणले जाते. त्यासाठी आधारभूत श्लोक असा-
नाशिकंच प्रयागं च 
पुष्करं नैमिषं तथा |
पश्चमं चं गयाक्षेत्री 
षष्ठं कुत्र न विद्यते ॥
 
(नाशिक, प्रयाग, पुष्कर, नैमिषारण्य व गया अशी पाच क्षेत्रे आहेत; सहावे कोठेही नाही.) याशिवाय नाशिकचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारा आणखी एक श्लोक ‘देवि भागवत’ मध्येही आहे. तो असा -
काशी पुरीच केदारो 
महाकालोऽथ नासिकं |
त्र्यंबक च महाक्षेत्र 
पंचदीपा इमो भुवि ॥
(काशी, केदारनाथ, उज्जैन, नाशिक व त्र्यंबकेश्वर हे पंचदीप म्हणजे पाच महासिद्धीस्थाने आहेत.) 
 
नाशिक आणि त्र्यंबकेश्वराचा आध्यात्मिक वारसा गोदावरी नदीमुळे अधिकच समृद्ध झाला आहे. ब्रह्मगिरीच्या परिसरातील गौतम ॠषींनी गोहत्येचे पाप नाहीसे करण्यासाठी तप करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरांच्या जटेतून ती ब्रह्मगिरीवर अवतरली. गौतम ऋषींनी आणली म्हणून तिला गौतमी-गंगा  म्हणतात; तर तिचा प्रवाह अंगावरून गेल्याने गो (म्हणजे गाय) जिवंत झाली या कारणाने ती गोदावरी झाली. याशिवाय दक्षिणवाही प्रवाहामुळे ती दक्षिणगंगा म्हणूनही ओळखली जाते. गोदावरीचा महिमा शिवपुराण, ब्रह्मपुराण, स्कंद पुराणातही वर्णन केला आहे. सिंहस्थपर्वकाळात तिचे केलेले स्नान अधिकच पुण्यप्रद असल्याचा निर्वाळा देणारा एक श्लोक आहे.
षष्ठिवर्ष-सहस्त्राणि 
भागीरथ्यवगाहनं |
सकृद् गोदावरीस्नानं 
सिंहस्थेच बृहस्पतो ॥
 
(साठ हजार वर्षांपर्यंत भागीरथी म्हणजे गंगानदीचे स्नान केल्याने जे पुण्य लाभते, ते सिंहस्थ पर्वणीत गोदावरीत स्नान केल्याने लाभते.)
 

Related Articles