युद्धाच्या विरोधात जगभरातील गोदी कामगारांचा संप   

 

बंदरांचा शस्त्रनिर्यातीसाठी वापर रोखण्याकरिता आंतरराष्ट्रीय मोहीम
 
पॅरिस : पश्चिम आशियासह गाझातील युद्ध तातडीने थांबविले जावे, बंदरांचा वापर शस्त्रनिर्यातीसाठी करू नका, बंदरांचे लष्करीकरण नको, गोदी कामगारांचे आयुष्य चांगले व्हावे,  या मागणीसाठी आंतरराष्ट्रीय मोहीम जगभरातील गोदी कामगार संघटनांनी शुक्रवारी राबविली. त्या अंतर्गत युरोपसह अन्य देशांतील बंदरावर शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारला होता.
 
फ्रान्स, इटली, ग्रीस, स्पेन, तुर्किये आणि मोरक्कोतील गोदी कामगार संंघटनांनी संयुक्तपणे गाझासह पश्चिम आशियातील युद्ध तातडीने थांबविण्यासाठी बंदरांचा शस्त्रपुरवठ्यासाठी होणारा वापर टाळावा, अशी आग्रही मागणी केली. 
 
बंदरांचा वापर शस्त्रांची, दारूगोळा, लष्करी उपकरणे आणि सैन्य तुकड्यांची वाहतूक करण्यासाठी होता कामा नये, आम्हाला युद्ध नको आहे, गोदी कामगारांनी युद्धपिपासू देशांना ठणकावून सांगितले आहे. विविध देशांतील १०० हून अधिक बंदरावरील कामगार निदर्शने चळवळीत सहभागी झाली होती. त्यामुळे बंदरावरील कामकाजात अडथळे येण्याची शक्यता देखील वाढली आहे. त्यामध्ये युरोपातील काही भाग, भूमध्य सागर परिसर आणि उत्तर अमेरिका यांचा समावेश आहे. 
 
ग्रीसमध्ये ईएईडीईपी गोदी कामगार संघटनेने पिरियस बंदरावर आंदोलन केले. हे देशातील सर्वांत मोठे बंदर आहे. आंदोलनामुळे अनेक बंदरांवर जहाजे उभी होती. प्रवासी जहाजांची वाहतूक बंद पडली होती. कारण प्रवासी जहाज कर्मचारी संघटनांनी चांगले वेतन, सुरक्षेत सुधारणा आणि चांगल्या कामाच्या पद्धतीसाठी स्वतंत्रपणे संप पुकारला होता.
 
इटलीतील युनियन सिंडिकेट दी बेस (यूएसबी  जिओआ, ट्रिस्टेट आणि जिओइया ताउरा या बंदरावर संप पुकारून तेथे देखील जीवनमान खर्च, कमी वेतन आणि लष्करावर होणार्‍या खर्चाविरोधात आवाज उठवला होता.
 
फ्रान्समधील जीजीटी पोर्ट्स आणि डॉक फेडरेशन यांनी ले हाव्रे, मार्सिले, डंकर्क आणि रौएन बंदरावर एक दिवसाचा संप पुकारला होता. बंदराचे लष्करीकरण थांबवा, अशी मागणी करत युरोपीयन धोरणांचा निषेध केला. तसेच फ्रान्स सरकारने याबाबत अंदाजपत्रकात केलेली तरतूद मागे घ्यावी, अशी मागणी केली. अशी तरतूद करून सरकारने सामाजिक सुरक्षेला धोका निर्माण केला असल्याचा आरोप संघटनेने केला. 
 
गोदी कामगारांच्या संपामुळे तेथील परिस्थितीत विस्कळीतपणा आला की नाही, हे मात्र समजले नसले तरी बंदरावर दिवसभर तुरळक वर्दळ होती. पुरवठा साखळी व्यवस्थापन कंपनी सी. एच. रॉबिनसन यांनी आपल्या ग्राहकांसाठी सूचना जाहीर केली. त्या अंतर्गत कामकाज विस्कळीत होईल, असे म्हटले आहे. माल वाहतूक होण्यास काहीसा उशीर होईल. तज्ज्ञांच्या मते जागतिक पुरवठा साखळीवर संपाचा परिणाम होईल असा अंदाज वर्तविला. 
 

Related Articles