मेटाच्या एआय धोरणाविरोधात नॉर्वेतील माध्यम संस्था न्यायालयात   

बातम्या, छायाचित्रे आणि चित्रफितीमधील मजकुराच्या वापरावर आक्षेप

ओस्लो : फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाच्या नव्या अटींविरोधात नॉर्वेमधील प्रमुख माध्यम संस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. मेटाच्या एआय उत्पादनांच्या विकासासाठी बातम्यांचे लेख, छायाचित्रे, चित्रफिती आणि सशुल्क प्रवेश असलेला मजकूरही वापरला जाऊ शकतो, अशी भीती या संस्थांनी व्यक्त केली आहे. नव्या अटी लागू करण्यापासून कंपनीला रोखण्याची मागणी माध्यम संस्थांनी केली आहे.
 
या अटी २० नोव्हेंबर २०२६ पासून फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्यावसायिक खाती चालवणार्‍या संस्था व कंपन्यांना लागू होणार आहेत. त्यानुसार, मेटाला संबंधित वेबसाइट्सवरील बातम्या, छायाचित्रे आणि चित्रफिती गोळा करून एआय-आधारित सेवा विकसित करण्यासाठी वापरण्याचा अधिकार मिळू शकतो.
 
वाचण्यासाठी पैसे द्यावे लागणार्‍या बातम्या आणि लेखांचाही या अटींमध्ये समावेश होण्याची शक्यता असल्याने माध्यम संस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. पत्रकारितेसाठी वार्तांकन, संशोधन आणि मजकूरनिर्मितीवर मोठी गुंतवणूक केली जाते. या सामग्रीचा एआय साधने विकसित करण्यासाठी वापर झाल्यास माध्यमांच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

मेटाने मुदत वाढवली

मेटाने नव्या अटी लागू करण्यासाठी सुरुवातीला ३० ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती. मात्र, माध्यम संस्था आणि अन्य संबंधित पक्षांनी आक्षेप घेतल्यानंतर कंपनीने ही मुदत २० नोव्हेंबर २०२६ पर्यंत वाढवली. बदलांविषयी भागीदारांना अधिक माहिती देण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. मात्र, माध्यम संस्थांचे समाधान झालेले नाही. केवळ स्पष्टीकरण देण्याऐवजी बातम्या आणि अन्य सामग्रीवरील हक्कांचे संरक्षण करणारे स्पष्ट व प्रभावी नियम आवश्यक असल्याची त्यांची मागणी आहे.
 

Related Articles