अमेरिका आणि जपान क्षेपणास्त्रांची निर्मिती करणार   

‘ऑपरेशन सुपरचार्ज’अंतर्गत संयुक्त उत्पादन केंद्र

सेबू : चीनच्या वाढत्या आक्रमकतेबाबत चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिका आणि जपानने अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या हवेतून हवेत मारा करणार्‍या क्षेपणास्त्रांच्या संयुक्त उत्पादनासाठी जपानमध्ये केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. जपानचे संरक्षणमंत्री शिंजिरो कोइझुमी यांनी ही घोषणा केली. आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांनी संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
 
फिलिपिन्समधील सेबू प्रांतात दक्षिण-पूर्व आशियाई देशांच्या संरक्षणप्रमुखांची वार्षिक बैठक सुरू आहे. या बैठकीदरम्यान कोइझुमी यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी क्षेपणास्त्र निर्मिती केंद्राबाबत माहिती दिली. ‘ऑपरेशन सुपरचार्ज’ या संयुक्त उपक्रमांतर्गत क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येणार असून, ही क्षेपणास्त्रे एफ-३५ लढाऊ विमानांसाठी आवश्यक असल्याचे कोइझुमी यांनी स्पष्ट केले. मात्र, या प्रकल्पाच्या तांत्रिक तपशिलांबाबत आणि कराराच्या अन्य बाबींबाबत त्यांनी अधिक माहिती दिली नाही.
 
अमेरिका निर्मित एफ-३५ ही जगातील अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक असून, जपानच्या संरक्षण दलातही या विमानांचा समावेश आहे. त्यामुळे क्षेपणास्त्रांचे संयुक्त उत्पादन दोन्ही देशांच्या संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे.सेबू येथे हेगसेथ यांच्याशी झालेल्या चर्चेत प्रादेशिक सुरक्षेची परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याबाबत दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली. बळाचा वापर, दबाव किंवा अन्य मार्गांनी एकतर्फी पद्धतीने प्रादेशिक स्थिती बदलण्याच्या प्रयत्नांना विरोध असल्याचे कोइझुमी यांनी सांगितले. कायद्याच्या राज्यावर आधारित स्वतंत्र आणि खुली आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम राखण्यावरही त्यांनी भर दिला. तथापि, ही चर्चा कोणत्याही विशिष्ट देशाला लक्ष्य करून करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, हेगसेथ यांनी दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या  संरक्षणमंत्र्यांसोबत झालेल्या स्वतंत्र बैठकीत प्रादेशिक आक्रमकतेला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याच्या अमेरिकेच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
 

Related Articles