अभय फिरोदिया यांना आयओजे अहिंसा पुरस्कार   

लंडन : फोर्स मोटर्सचे अध्यक्ष आणि अभय फिरोदिया समूहाचे प्रमुख अभय एन. फिरोदिया यांना लंडन येथील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ जैनॉलॉजी’तर्फे (आयओजे) दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘अहिंसा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. खासदार मॅट टर्मेन आणि कार्डिनल जॉर्ज जेकब कुवाकाड यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. अहिंसा, करुणा आणि सर्व जीवांप्रती आदर या मूल्यांच्या प्रसारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल फिरोदिया यांचा गौरव करण्यात आला.
 
यापूर्वी नेल्सन मंडेला, दलाई लामा आणि ब्रिटनचे राजे चार्ल्स तृतीय यांसारख्या प्रतिभावंतांना हा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. जैन तत्त्वज्ञान आणि त्यातील मूल्यांचा व्यापक समाजाला परिचय करून देण्यासाठी फिरोदिया यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. अहिंसा, अपरिग्रह  आणि अनेकांतवाद (विविध दृष्टिकोनांचा आदर) या तत्त्वांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ‘अहिंसा हा जैन मूल्यांच्या संपूर्ण गहन आणि व्यापक पटाचा एका शब्दातील सारांश आहे,’ असे फिरोदिया यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले. या तत्त्वज्ञानाचा परिचय करून देण्याच्या उद्देशातून पुण्याजवळील अभय प्रभावना संग्रहालय आणि ज्ञानकेंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दशकभराच्या प्रयत्नांतून साकारलेल्या या केंद्रात प्रदर्शन, कलाकृती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जैन धर्माचे तत्त्वज्ञान, संस्कृती आणि इतिहास उलगडण्यात आला आहे.
 

Related Articles