जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा मार्ग मोकळा   

नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या कायदेशीर पेचामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या राज्यातील २० जिल्हा परिषदा आणि २२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकशाही प्रक्रिया अनिश्चित काळासाठी रोखून धरता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने हंगामी व्यवस्था म्हणून निवडणुका घेतल्या जाव्यात, असे सांगितले. पण, त्याचवेळी त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असेही न्यायालयाने नमूद केले आहे. 
 
ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील तीस सदस्यांच्या पीठाने महाराष्ट्रातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले. यापूर्वीच्या हंगामी आदेशानुसार ज्या निवडणुका पार पडल्या आहेत, त्याच अटी आणि शर्तींवर उर्वरित निवडणुका देखील घेतल्या जाव्यात. निवडणुका रोखून ठेवण्याचे कोणतेही समर्थन असू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
 
२०२५ च्या मे महिन्यात न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी, बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या व्यवस्थेनुसार निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. पण, काही ठिकाणी आरक्षणाची एकूण मर्यादा ५० टक्कयांपेक्षा अधिक होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने पुन्हा कायदेशीर पेच निर्माण झाला होता.
 
सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी लोकशाही प्रक्रिया का थांबवली जावी? अशी विचारणा केली. महाधिवक्ता यांनी कोणाला तरी यावर आक्षेप असू शकतो? असे नमूद केले. यावर सरन्यायाधीश म्हणाले की, आम्ही आधीच असा आदेश दिला आहे की, हंगामी व्यवस्था म्हणून निवडणुका घेतल्या जाव्यात. ज्या निवडणुका अजून बाकी आहेत, त्याही घेतल्या जाऊ शकतात. पण, त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असणार आहेत. त्यामुळे आता उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा आहे. आता राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम कधी जाहीर करतो? मतदानाची प्रक्रिया कशी आखली जाते? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
 
पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, बीड, जालना, नांदेड, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या निवडणुका प्रलंबित आहेत. 
 

Related Articles