आरोप निश्चितीचा आदेश न्यायालयाने राखून ठेवला   

नीट पेपरफुटी प्रकरण

नवी दिल्ली : नीट-यूजी पेपर फुटी प्रकरणातील १४ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबतचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. याबाबत १८ नोव्हेंबर रोजी आदेश दिला जाईल, असे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी सांगितले. 
 
या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) केला जात आहे. सीबीआयने जुलै महिन्यात १३ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर, १४ वा आरोपी शेषराव बजरंग सूर्यवंशी याच्याविरुद्ध सीबीआयने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. सूर्यवंशी याला २ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. तो मूळचा नादेंडचा रहिवासी आहे. 
 
राष्ट्रीय परीक्षा संस्थे (एनटीए) तर्फे नीटसह विविध परीक्षांचे आयोजन केले जाते. ३ मे रोजी नीटची परीक्षा पार पडली होती. मात्र, ७ मे रोजी पेपरफुटी समोर आली. १२ मे रोजी एनटीएने परीक्षा रद्द केली आणि १४ मे रोजी फेरपरीक्षेची तारीख जाहीर केली. त्यानंतर, २१ जून रोजी फेरपरीक्षा पार पडली.
 
यादरम्यान, नीटसह विविध प्रश्नांवरुन जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. दुसरीकडे, पेपरफुटीला चाप बसावा, यासाठी संसदेत परीक्षा सुधारणा विधयेक मंजूर करण्यात आले. याअंतर्गत कठोर शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.सीबीआयने ‘आरसीसी’चा संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर, मनीषा वाघमारे, धनंजय लोखंडे, शुभम खैरनार, यश यादव, मंगीलाल बिवाल, विकास बिवाल, दिनेश बिवाल, डॉ. मनोज शिरुरे, तेजस हर्षदकुमार शहा आणि शेषराव सूर्यवंशी यांना अटक केली आहे. 
 

Related Articles