उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची मुसंडी   

लखनौ : उत्तर प्रदेश विधान परिषद निवडणुकीत ११ पैकी सहा जागा भाजपने जिंकल्या. तर, समाजवादी पक्षाने ५ जागांवर विजय निश्चित केला आहे. समाजवादी पक्षाने लखनौ पदवीधर मतदारसंघ जिंकला असून, वाराणसी पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजपने जागा कायम राखल्या असल्या तरी समाजवादी पक्षांने दोन अतिरिक्त जागा मिळवित जोरदार मुसंडी मारली आहे.
 
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. तर, मंगळवार (२७ रोजी) मतमोजणीला सुरूवात झाली होती. बुधवारी भाजपने आग्रा पदवीधर, बरेली-मुरादाबाद शिक्षक, लखनौ शिक्षक, मेरठचे दोन्ही (शिक्षक व पदवीधर) आणि गोरखपूर-फैजाबाद शिक्षक मतदारसंघांत विजय नोंदविला होता. तर, समाजवादी पक्षाने अलाहाबाद-झाशी पदवीधर, तसेच वाराणसी आणि आग्रा-अलीगढ शिक्षक मतदारसंघात विजय मिळविला होता.
 
समाजवादी पक्षाच्या उमेदवार कांती सिंग यांनी काल लखनौ पदवीधर मतदारसंघात विजय मिळवला. कांती सिंग यांना ५१,१६८ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार अवनीश कुमार सिंग यांना ३६,३१३ मतांवर समाधान मानावे लागले. 
 
वाराणसी पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांच्या नवव्या फेरीनंतर समाजवादी पक्षाचे आशुतोष सिन्हा यांना ५०,४६२ मते मिळाली. तर भाजपचे उमेदवार केदार नाथ सिंग यांना ३३,४७८ मते मिळाली. केदार नाथ सिंग यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे आपला पराभव मान्य केला.
 

Related Articles