कर्करोगावरील ३९७ औषधांच्या किमती घटल्या   

ऐंशी हजारांचे इंजेक्शन आता सात हजारांत 

नवी दिल्ली : कर्करोगाच्या उपचारांचा वाढता खर्च सहन करणार्‍या रुग्णांना दिलासा देणारा निर्णय राष्ट्रीय औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाने कर्करोगाच्या ५४३ औषधांच्या ब्रँड आणि पॅकच्या कमाल किरकोळ किमतींमध्ये सुधारणा केली असून, त्यापैकी ३९७ औषधांच्या किमती कमी झाल्या आहेत. नव्या किमती ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. या निर्णयामुळे कर्करोगाच्या उपचारांसाठी होणारा औषधांचा खर्च कमी होण्याची अपेक्षा आहे.
 
नव्या दरांनुसार, २१७ औषधांच्या किमतींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक कपात करण्यात आली आहे. काही औषधांच्या किमती ७० ते ९० टक्क्यांपेक्षाही अधिक कमी झाल्या आहेत. त्यामुळे महागड्या औषधांवर अवलंबून असलेल्या रुग्णांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. मात्र, यादीतील १४६ औषधांच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
 
दरकपातीतील महत्त्वाचे उदाहरण म्हणजे सॅमटेपा. या इंजेक्शनची किरकोळ किंमत ८० हजारांवरून रुपयांवरून ७ हजार १५० रुपयांपर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत सुमारे ९१ टक्के कपात झाली आहे. तसेच, पॅलबोप्रोच्या २१ कॅप्सूलच्या पॅकची किंमत ४० हजार ४२१ रुपयांवरून २ हजार ७२० रुपये करण्यात आली आहे. या औषधाच्या किमतीत ९३ टक्के कपात झाली आहे.काही महागड्या औषधांचे दर कायम  अनेक औषधांच्या किमती कमी झाल्या असल्या, तरी काही महागड्या कर्करोगविरोधी औषधांचे दर कायम आहेत. 
 

Related Articles