सह्याद्रीच्या कुशीत जन आंदोलनाचा एल्गार   

टोरेंट प्रकल्पाला आदिवासी समाजाचा तीव्र विरोध

भीमाशंकर, (वार्ताहर) : सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या खेड व आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन व जतन करण्यासाठी आदिवासी ग्रामस्थांनी एकत्र येत टोरेंट प्रकल्पाविरोधात तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भातील महत्त्वपूर्ण बैठक गुरूवारी भीमाशंकर येथील कळमजाई माता मंदिरात पार पडली.
 
या बैठकीला आदिवासी भागातील विविध गावांमधील सरपंचांसह सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सह्याद्रीच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी सर्वानुमते संघटितपणे लढा देण्याचा पवित्रा यावेळी घेण्यात आला. बैठकीदरम्यान आंबेगाव पंचायत समितीचे सदस्य संजय गवारी, खेड बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल वनघरे यांनी आपली मते मांडली. 
 
आदिवासी समाजाच्या हिताचे रक्षण, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत सखोल चर्चा झाली. टोरेंट प्रकल्पामुळे होणारी मोठ्या प्रमाणातील जंगलतोड बिघडणारा पर्यावरणाचा समतोल आणि स्थानिक जल स्तोत्रांवर होणारे संभाव्य दुष्परिणाम याबाबत ग्रामस्थांना जागृत करण्याचा निर्णय घेण्यात आला. फुलवडे, गंगापूर, आपटी, कानसे व परिसरातील गावांमध्ये होऊ घातलेल्या ’ पंप स्टोरेज’ विद्युत प्रकल्पाला सर्व आदिवासी जनता मोठ्या ताकतीने विरोध करणार असून, यासंदर्भात वन विभागाकडे सविस्तर माहिती देण्यात मागवण्यात आली आहे. 
 
आदिवासी भागातील सर्व ग्रामपंचायतींचे विरोधदर्शक ठराव संकलित करून, ’पेसा कायद्या’ अंतर्गत महाग्रामसभा आयोजित केली जाणार आहे. या महाग्रामसभेचे ठराव केंद्र व राज्य सरकारकडे पाठवून शासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधण्यात येणार आहे. सह्याद्री हा केवळ डोंगररांगांचा भाग नसून तो आदिवासी समाजाच्या जीवनमानाचा, संस्कृतीचा आणि उपजीविकेचा मुख्य आधार आहे. त्यामुळे येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
 

Related Articles