संकष्टीनिमित्त लेण्याद्रीत भाविकांची गर्दी   

लेण्याद्री, (वार्ताहर) : संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायकांपैकी एक असलेले श्री क्षेत्र लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीचे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ सुरू झाली होती. पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातील विविध गावांतून आलेल्या हजारो भाविक व पर्यटकांनी श्रींचे दर्शनाचा लाभ घेतला.
 
संपूर्ण लेण्याद्री परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. संकष्टी चतुर्थीनिमित्त ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीच्या मूर्तीसह मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. या सजावटीमुळे मंदिराच्या परिसराला विशेष धार्मिक आणि प्रसन्न स्वरूप प्राप्त झाले होते. ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीचे दर्शनासाठी आलेल्या भाविक व पर्यटकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता.
 
संकष्टीनिमित्त श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने सकाळी ६.१५ वाजता देवस्थानचे विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते ‘श्री गिरिजात्मज’ गणपतीच्या मूर्तीस विधीवत अभिषेक व महापूजा करण्यात आली. त्यानंतर भाविक व पर्यटकांकरीता श्रींचे दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. मंदिरात सकाळी ७ वाजता, दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता श्रींची महाआरती करण्यात आली. संकष्टी चतुर्थीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक विधी आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविक व पर्यटकांना श्रींचे दर्शन सुलभतेने घेता यावे, याकरीता देवस्थान ट्रस्टच्या वतीने नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली होती. 
 
दर्शनासाठी येणार्‍या भाविक व पर्यटकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर देवस्थान प्रशासनाने भर दिला. संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री क्षेत्र लेण्याद्री परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
 

Related Articles