महापौरांनी केली कर्मचार्‍यांची दिवाळी गोड   

२ नोव्हेंबरपर्यंत वेतन, अनुदान आणि अग्रिम जमा करण्याचे निर्देश

सोलापूर, (प्रतिनिधी) : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिका कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्मचार्‍यांच्या सानुग्रह अनुदानात ९०० रुपयांची वाढ करून ते ४ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय महापौर विनायक कोंड्याल यांनी घेतला आहे. तसेच, १२ हजार ५०० रुपयांचे सणाचे अग्रिम कायम ठेवण्यात आले असून, अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम प्रतीक्षा यादीप्रमाणे अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
 
दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांच्या बँक खात्यांत वेतन, सानुग्रह अनुदान आणि सणाचे अग्रिम जमा व्हावे, यासाठी २ नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.
 
महापौर विनायक कोंड्याल यांनी बुधवारी सायंकाळी कामगार संघटना कृती समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. विविध कामगार संघटनांनी सानुग्रह अनुदानात वाढ करण्याबाबत निवेदने दिली होती. या मागण्यांचा विचार करून अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर, नगर सचिव प्रवीण दंतकाळे, कामगार नेते अशोक जानराव, शेषराव शिरसाट यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुट्टीच्या दिवशीही कामकाजाचे निर्देश 

दिवाळी ५ नोव्हेंबरपासून सुरू होत असल्याने कर्मचार्‍यांना सणापूर्वी आर्थिक लाभ मिळावेत, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध कार्यवाही करावी, असे महापौरांनी स्पष्ट केले. देयकांची तपासणी वेळेत पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांनी कार्यालयात उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रतीक्षा यादीतील कर्मचार्‍यांनाही दिलासा

मार्च २०२६ मधील प्रतीक्षा यादीप्रमाणे महापालिका कर्मचार्‍यांच्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. त्यामुळे या रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचार्‍यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
 
इलसानुग्रह अनुदानातील वाढ, सणाचे अग्रिम आणि अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत घेतलेल्या निर्णयांबद्दल कामगार संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, शेषराव शिरसाट यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी महापौर विनायक कोंड्याल यांचे आभार मानले. या निर्णयामुळे महापालिका कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 

Related Articles