हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने भाजपच्या राजकीय गणितांना धक्का   

शिक्षकमध्ये मात्र भाजपची बाजी   

सोलापूर, (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या राजकारणात सत्ता, पैसा, संघटनशक्ती आणि सत्ताधार्यांचा प्रभाव यांना नेहमीच महत्त्व दिले जाते. मात्र, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निकालाने या समीकरणांना छेद देत मतदारांच्या विवेकाची ताकद दाखवून दिली. महायुतीने प्रतिष्ठेची केलेली ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली असताना महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय खेचून आणला. दुसरीकडे, पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी बाजी मारली. एकाच निवडणूक प्रक्रियेत दोन वेगवेगळे निकाल समोर आल्याने राजकीय पक्षांची रणनीती, उमेदवारांची कामगिरी आणि मतदारांशी असलेला संवाद या मुद्द्यांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
 
या निकालातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला मिळालेले यश. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या विजयाने भाजपच्या राजकीय गणितांना धक्का बसला. महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्या विजयाची चर्चा असताना मतदारांनी वेगळाच कौल दिला. त्यामुळे केवळ सत्तेच्या ताकदीवर विजयाची खात्री देता येत नाही, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.
 
या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांना आर्थिक प्रलोभने दाखविल्याची आणि ‘लक्ष्मीदर्शना’ची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. काही ठिकाणी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर झाल्याचे आरोपही केले गेले. मात्र, निकालातून एवढे स्पष्ट होते की, मतदारांचा कौल गृहीत धरून चालणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही.
 
पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अरुण लाड यांनी प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर या मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख-जाधव यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिली. त्यांना काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पाठबळ दिले. भाजपची संघटनात्मक ताकद आणि सत्तेतील स्थान लक्षात घेता हा विजय महाविकास आघाडीसाठी राजकीय ऊर्जा देणारा ठरला आहे.
 
निवडणुकीपूर्वी सोलापुरात झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय मेळाव्यात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पदवीधर मतदार नोंदणी वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींना विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मतदार नोंदणी वाढविणे आणि प्रत्यक्ष मतदानातून विजय मिळविणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मतदारांची नोंदणी झाली म्हणजे त्यांची मते आपोआप पक्षाच्या पारड्यात पडतात, असे नाही. पदवीधर निकालाने याच राजकीय वास्तवाची जाणीव करून दिली आहे.

काँग्रेसला आत्मपरीक्षणाची वेळ

पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळाले असताना पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात मात्र वेगळे चित्र दिसले. काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि उमेदवार जयंत आसगावकर यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर भाजपचे कौस्तुभ गावडे विजयी झाले. या निकालामुळे भाजपला एका मतदारसंघात धक्का बसला असला तरी दुसर्या मतदारसंघात विजय मिळवून आपली राजकीय ताकद दाखविण्याची संधी मिळाली. आसगावकर यांच्याविरोधात प्रचारादरम्यान शिक्षकांच्या प्रश्नांकडे पुरेसे लक्ष न दिल्याचे आरोप करण्यात आले होते. शिक्षकांच्या अडीअडचणी, प्रलंबित मागण्या, सेवा-संबंधित प्रश्न आणि शासनदरबारी पाठपुरावा या मुद्द्यांवर मतदारांमध्ये नाराजी असल्याची चर्चा होती. या निकालाने काँग्रेससमोर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.

पैशाला नव्हे, तर विचारांना कौल

पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख-जाधव यांचा विजय हा लोकशाही मूल्यांचा आणि पुरोगामी विचारांचा विजय आहे. सत्तेचा प्रभाव, मोठी प्रचार यंत्रणा आणि विविध आमिषांच्या जोरावर मतदारांना प्रभावित करता येईल, असे महायुतीला वाटत होते; मात्र सुशिक्षित पदवीधर मतदारांनी आपल्या विवेकाने मतदान करत महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त केला. हा विजय शरद पवार यांच्या पुरोगामी विचारांचा आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीचा आहे.
 
- महेश गादेकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)

मविआच्या एकजुटीचा विजय

पुणे पदवीधर मतदारसंघातील निकालाने महाविकास आघाडीची एकजूट आणि कार्यकर्त्यांची मेहनत सिद्ध केली आहे. काँग्रेससह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी समन्वयाने काम केल्यामुळे हर्षदा देशमुख-जाधव यांना विजय मिळवता आला. मतदारांना गृहीत धरणार्या आणि केवळ सत्तेच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, असे समजणार्या प्रवृत्तींना या निकालाने उत्तर दिले आहे. शिक्षण, रोजगार, बेरोजगार पदवीधरांचे प्रश्न आणि युवकांच्या भवितव्याला प्राधान्य देणारे राजकारण करण्याची अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे.
 
- चेतन नरोटे, शहराध्यक्ष, काँग्रेस

शिक्षकांचा विकासाच्या राजकारणाला कौल

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील कौस्तुभ गावडे यांचा विजय हा भाजपच्या संघटनात्मक ताकदीचा आणि शिक्षकांनी दाखविलेल्या विश्वासाचा विजय आहे. शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक, शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणा आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. विरोधकांनी केलेल्या टीकेला शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानातून उत्तर दिले आहे. हा विजय म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नसून शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी आहे. पदवीधरमध्ये मात्र आम्ही कमी पडलो. यापुढे दक्षता घेऊन नियोजनपूर्वक काम करू.
 
- रोहिणी तडवळकर, शहराध्यक्ष, भाजप
 

Related Articles