उजनीतील डेटा सेंटर विकास नव्हे,विनाशाची वाट : रोहित पवार   

पुणे : उजनी येथे प्रस्तावित कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) डेटा सेंटर आणि अणुऊर्जा प्रकल्पांमुळे विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा र्‍हास होण्याची भीती आहे. या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि वीज लागणार असून, त्याचा परिणाम साडेपाच लाख शेतकरी आणि 30 हजार मच्छीमार कुटुंबांवर होऊ शकतो, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. उजनीतील एआय डेटा सेंटर हा विकास की विनाश? असा सवालही त्यांनी केला.
 
पवार म्हणाले की, दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून उजनी धरणाची निर्मिती झाली. या धरणामुळे हजारो एकर जमीन सिंचनाखाली आली आणि शेतीला बळ मिळाले. या पाण्यावर शेती, मत्स्यव्यवसाय आणि अनेक कुटुंबांचे अर्थकारण अवलंबून आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरणारे प्रकल्प उभारल्यास स्थानिक नागरिकांच्या पाण्याच्या गरजांवर मर्यादा येण्याची शक्यता आहे. सरकारने उजनी परिसरात दोन हजार मेगावॉट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प आणि 450 मेगावॉट क्षमतेचा अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या प्रकल्पांसह डेटा सेंटरमध्ये सुमारे एक लाख 65 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे. चीनमधील सॅनी कंपनीकडून तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन असून, फ्रान्स आणि दक्षिण कोरियातील कंपन्यांचाही त्यात सहभाग असल्याचा दावा पवार यांनी केला.
 
पाण्याच्या वापरावरून गंभीर प्रश्‍न
 
डेटा सेंटरमधील सर्व्हर थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि वीज लागते. त्यामुळे प्रस्तावित प्रकल्पामुळे उजनी परिसरातील जलसाठ्यावर ताण येऊ शकतो, अशी भीती पवार यांनी व्यक्त केली. त्यांच्या दाव्यानुसार, प्रस्तावित डेटा सेंटरसाठी सहा टीएमसी, तर अणुऊर्जा प्रकल्पासाठी तीन टीएमसी पाणी लागणार आहे. ठाणे शहराला वर्षभरात सुमारे 8.25 टीएमसी पाणी लागते. त्या तुलनेत या दोन प्रकल्पांसाठी नऊ टीएमसी पाण्याची गरज असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. या प्रकल्पांमुळे उजनी धरणावर अवलंबून असलेल्या साडेपाच लाख शेतकर्‍यांच्या सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. राज्याच्या एकूण वीजवापरापैकी आठ टक्के वीज केवळ डेटा सेंटरसाठी लागेल, असाही दावा त्यांनी केला.
 
मच्छीमारांच्या रोजगारावरही परिणाम होण्याची भीती
 
उजनी जलाशयातील मासेमारीवर सुमारे 30 हजार कुटुंबे अवलंबून आहेत. या व्यवसायातून सुमारे 200 कोटी रुपयांची उलाढाल होते, असे पवार यांनी सांगितले. जलाशयावर सौरऊर्जा पॅनेल बसवल्याने माशांच्या अधिवासावर आणि जलचरांवर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मध्य प्रदेशातील ओंकारेश्‍वर येथील तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाचा दाखला देत त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. डेटा सेंटरमधील शीतकरण यंत्रणा सतत सुरू राहणार असल्याने निर्माण होणारा आवाज, वाढती वीजमागणी आणि पाण्याचा वापर यांचाही पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो, असे ते म्हणाले.
 
डेटा सेंटरमुळे जागतिक तापमानवाढ, पाण्याचा र्‍हास आणि स्थानिक संसाधनांवरील ताण वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणार्‍या किरणोत्सर्गी कचर्‍याच्या व्यवस्थापनाबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. दक्षिण कोरियातील कंपनीने यापूर्वी अशा प्रकारचा प्रकल्प राबवला नसल्याचा दावा करत, 568 एकर जागेवरील या नियोजनाबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
 
स्थानिकांच्या हिताचा विचार करण्याची मागणी
 
कर्जत-भीमाशंकर येथे विकासाच्या नावाखाली हजारो झाडे तोडण्यात आली. मात्र, नागरिकांच्या एकजुटीमुळे वृक्षतोड थांबवता आली. उजनीच्या बाबतीतही स्थानिकांच्या हिताचा विचार झाला पाहिजे, असे पवार म्हणाले. प्रकल्पांमधून मिळणार्‍या आर्थिक फायद्याबरोबरच पाणी, वीज, पर्यावरण, शेती आणि स्थानिक रोजगारावर होणार्‍या परिणामांचाही सखोल विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles