पाणीगळती, पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर कारवाई करा   

महापौरांचे प्रशासनाला निर्देश 

पुणे : शहरातील गंभीर पाणीटंचाईच्या पाश्‍वर्र्भूमीवर पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनाला पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्यासह पाणीगळती, अनधिकृत नळजोडण्या आणि पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेच्या सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये स्वतंत्र ‘पाणीटंचाई व आपत्ती नियंत्रण कक्ष’ स्थापन करून ते 24 तास कार्यरत ठेवण्याची सूचना त्यांनी केली आहे. तसेच, केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत महापौर कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
 
धरणांमधील मर्यादित जलसाठा आणि दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांना पुरेसे व नियमित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे महापौरांनी स्पष्ट केले आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे आणि अपव्यय पूर्णपणे थांबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. शहरातील मुख्य जलवाहिन्या, वितरण वाहिन्या आणि पाण्याच्या टाक्यांमधील गळती शोधून ती तातडीने दुरुस्त करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अनधिकृत नळजोडण्या तसेच व्यावसायिक कारणांसाठी होणारी पाणीचोरी शोधून संबंधित जोडण्या खंडित कराव्यात आणि दोषींवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करावी, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.
 
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात स्वतंत्र नियंत्रण कक्ष
 
महापालिकेच्या सर्व 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पाणीटंचाई व आपत्ती नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कक्षांमध्ये पाणीपुरवठा, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांतील अधिकारी व कर्मचारी विविध पाळ्यांमध्ये 24 तास कार्यरत राहणार आहेत.नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन क्रमांक आणि व्हॉट्सअ‍ॅप तक्रार निवारण यंत्रणा सुरू करण्याची सूचनाही करण्यात आली आहे. पाणीगळती, टँकरची मागणी आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे 24 तासांच्या आत निराकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
गाड्या धुणे, लॉनला पाणी देण्यावर बंदी
 
पिण्याच्या पाण्याचा वापर गाड्या धुणे, खासगी बांधकामे, जलतरण तलाव, बागा व लॉनला पाणी देणे तसेच रस्ते धुणे यांसारख्या बिगर-पिण्याच्या कामांसाठी करण्यास बंदी घालण्याची सूचना करण्यात आली आहे. या निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच, आवश्यकतेनुसार नळजोडणी खंडित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
 
टँकरच्या दरांवरही नियंत्रण
 
पाणीटंचाईच्या काळात टँकरद्वारे होणार्‍या पाणीपुरवठ्यात पारदर्शकता राहावी आणि नागरिकांची आर्थिक लूट होऊ नये, यासाठी टँकर व्यवस्थापनावर क्षेत्रीय कार्यालयांतील नियंत्रण कक्षाचे नियंत्रण असावे, अशी भूमिका महापौरांनी मांडली आहे. टंचाईग्रस्त भागांत महापालिकेमार्फत मोफत टँकर उपलब्ध करून देण्याबरोबरच खासगी टँकरच्या दरांवर कठोर मर्यादा घालून पाण्याचा काळाबाजार रोखण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
 
समान पाणीवाटपावर भर
 
उपलब्ध जलसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन शहरासाठी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहराच्या शेवटच्या टोकावरील भागांनाही पुरेसे पाणी मिळावे आणि सर्व भागांत समतोल पाणीवाटप व्हावे, यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

Related Articles