आरोप-प्रत्यारोपांपेक्षा आत्मचिंतन करा : बावनकुळे   

पुणे, नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधणार

पुणे : पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघांतील पराभवाची कारणे शोधून त्यांचा सविस्तर अभ्यास करण्यात येईल. निवडणुकीतील मतदानाचा कल वेगळा होता. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करावे. पक्षाच्या विरोधात काम करणार्‍यांबाबत योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
 
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, पुणे आणि नागपूर या जागा यापूर्वी काँग्रेसकडे होत्या. यंदा त्या जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. प्रत्येक पदवीधर मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उणिवा राहिल्या असतील. त्या दूर करून पुढील निवडणुकीत या जागा जिंकण्यासाठी प्रयत्न करू. या निवडणुकीचा प्रभारी म्हणून माझी जबाबदारी मी स्वीकारली आहे.
 
मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करणे योग्य नाही
 
नागपूर मतदारसंघात 38 आमदार आहेत. हा मतदारसंघ केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाही. त्यामुळे या पराभवासाठी त्यांना लक्ष्य करणे योग्य नसल्याचे बावनकुळे म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तरी आम्ही जिंकू शकतो. महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, तेव्हा ईव्हीएम योग्य आणि पराभव झाला की मशीनमध्ये दोष, अशी भूमिका घेणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
 
नागपूरमध्ये पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये महायुती आघाडीवर होती; मात्र, दुसर्‍या पसंतीच्या मतांमुळे काँग्रेसचा विजय झाल्याचा दावाही त्यांनी केला.मतदारयाद्या वारंवार बदलण्याऐवजी त्या अद्ययावत करण्यावर भर द्यावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुणे शिक्षक मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत झाली होती, असेही त्यांनी सांगितले. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, त्यांनी बोलताना स्वतःची उंची लक्षात घ्यावी. राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, असा कौल दिला आहे. धंगेकर यांनी जनमत समजून घ्यावे. एकनाथ शिंदे यांनीही त्यांना समजावून सांगावे, असे ते म्हणाले. पुणे पदवीधर मतदारसंघातील विजयाचा उल्लेख करताना त्यांनी लाड यांच्या विजयाचाही संदर्भ दिला.
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जतसारख्या प्रकल्पांबाबत केलेल्या राजकीय विधानांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी जलविद्युत प्रकल्पांचे समर्थन केले. राज्यात अशा प्रकारचे 50 प्रकल्प उभे राहिले, तरी त्यांचा विचार केला पाहिजे. कोयना प्रकल्पामुळे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज मिळते. जलविद्युत प्रकल्प पर्यावरणपूरक आहेत. कोळशापासून वीज निर्मिती करताना मोठ्या प्रमाणावर राख निर्माण होऊन प्रदूषण होते. माझ्या घरावर दररोज किलोभर राख साचते, असे ते म्हणाले. कर्जतचा प्रकल्प पुन्हा रद्द झाला, तर राज्याच्या विकासाला धक्का बसेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

Related Articles