मतकरी, सखदेव, महाजन, ऐलवाड यांना इंदिरा अत्रे पुरस्कार   

पुणे : स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे पुरस्कृत ‘इंदिरा अत्रे बालसाहित्यकार’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. गणेश मतकरी, प्रणव सखदेव, आश्‍लेषा महाजन, ‘कुल्फी’ मासिक, सई देशपांडे, श्रीपाद ब्रह्मे, संजय ऐलवाड हे यंदाच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. पुरस्काराचे यंदाचे चौथे वर्ष आहे. संजय ऐलवाड हे गेल्या काही वर्षांपासून बाल साहित्यात ‘झिब्रा’ ही नायिका विकसित करत आहेत. झिब्रा मालिकेतील हे त्यांचे दुसरे पुस्तक आहे. गणेश मतकरी यांच्या ‘इअरफोन्स’ तर प्रणव सखदेव यांच्या ‘के कनेक्शन्स’ या किशोर-कुमारवयीन तसेच जेन-झी गटासाठी लिहिलेल्या पुस्तकाला, आश्लेषा महाजन यांच्या ‘गप्पी गप्पा आणि इतर कथा’ तसेच ऋषिकेश दाभोळकर, हर्षल कोर्‍हाळे यांच्या ‘कुल्फी’ दिवाळी अंकाला, अभिषेक जाखडे लिखित ‘जंगलातलं चांदणं’ या पुस्तकाच्या मुखपृष्ठ तसेच आतील चित्रांसाठी चित्रकार सई देशपांडे यांना तसेच विशेष उल्लेखनीय पुस्तक म्हणून श्रीपाद ब्रह्मे यांच्या ‘फुलपाखरू’ या पुस्तकास पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
पुरस्कार वितरण सोहळा 14 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवनमधील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त भारत सासणे यांच्या हस्ते होणार  असल्याची माहिती डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. व कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी दिली. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या मातोश्री इंदिराबाई अत्रे या बालसाहित्यिका म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2023 पासून मराठीतील बालसाहित्यकाराला पुरस्कृत करण्याचा मानस डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केला. त्यासाठी दरवर्षी प्रकाशित उत्तम बालसाहित्यकृती साकारणार्‍या लेखकांना पुरस्कार देण्यात येत असल्याचेही डॉ. भारती एम. डी. व प्रसाद भडसावळे यांनी सांगितले.

Related Articles