धायरीत आरएमसी प्रकल्पाची फक्त शेड पाडली   

सहा प्रकल्पांवर कारवाई

पुणे : धायरी येथील कालव्यालगत असलेल्या सहा रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्लांटवर पुणे महापालिका प्रशासनाने बुधवारी सकाळी कारवाई केली. मात्र, या कारवाईत प्लांटमधील मुख्य यंत्रणा आणि संरचना कायम ठेवून केवळ पत्र्यांच्या शेड पाडण्यात आल्याने कारवाईच्या परिणामकारकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे. सायलो सील करण्यात आले असले, तरी प्लांटची मुख्य यंत्रणा हटविण्यात आलेली नाही. दरम्यान, कारवाईदरम्यान एका मंत्र्याचा फोन आल्याने कारवाई थांबविण्याची सूचना करण्यात आल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. महापालिका हद्दीत सुमारे 100 ते 125 आरएमसी प्लांट असल्याचा अंदाज आहे.
 
या प्लांटमधून निर्माण होणारी धूळ आणि प्रदूषण यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. आरएमसी प्लांटच्या परवानग्या, नियमांचे पालन आणि प्रदूषण नियंत्रणाचा मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. यापूर्वी महापालिका प्रशासनाने लोहगावमधील खांदवेनगर परिसरातील सात आणि बावधन बुद्रुकमधील पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर कारवाई केली होती.
 
धायरीतील सहा आरएमसी प्लांटवर करण्यात आलेल्या कारवाईत पत्र्यांच्या शेड पाडण्यात आल्या, तर सायलो सील करण्यात आले. मात्र, प्लांटची मुख्य यंत्रणा आणि संरचना कायम राहिल्याने या कारवाईतून प्रत्यक्षात किती परिणाम साधला जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रदूषणाच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर केवळ शेड पाडण्याऐवजी संबंधित प्लांटच्या परवानग्या, नियमांचे पालन आणि प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची सखोल तपासणी करण्याची मागणी होत आहे.
 
वडगाव खुर्दमधील कारवाई वारंवार रद्द का?
 
वडगाव खुर्द परिसरातील नदीकिनारी आणि लगतच्या भागांत असलेल्या आरएमसी प्लांटवर कारवाई करण्याचे नियोजन वारंवार केले जाते; मात्र ऐनवेळी कारवाई रद्द होत असल्याचा आरोप काही प्लांटचालकांनी केला आहे. या परिसरात एका आमदाराच्या मुलाचा आणि एका नगरसेविकेचा प्लांट असल्याने कारवाई टाळली जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे. संबंधित लोकप्रतिनिधींकडून महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
 
नागरिकांची कृती समिती सक्रिय
 
आरएमसी प्लांटमधून होणारे धूळ आणि प्रदूषण यामुळे त्रस्त असलेल्या प्रयेजा सिटीसह परिसरातील सोसायट्यांमधील नागरिकांनी कृती समिती स्थापन केली आहे. प्रशासनाकडून अपेक्षित कठोर कारवाई होत नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. धायरीतील कारवाईदरम्यान मंत्र्याचा फोन आल्याचा दावा समोर आल्यानंतर संबंधित मंत्री कोण, तसेच कारवाईत हस्तक्षेप झाला का, असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. अनधिकृत व्यवसायांवरील कारवाईत राजकीय हस्तक्षेप होत असल्यास त्याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्‍नांवर होऊ शकतो. त्यामुळे सर्व आरएमसी प्लांटची निष्पक्ष तपासणी करून नियमभंग करणार्‍यांवर समान निकषांनुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
 
कारवाईदरम्यान मंत्र्याचा फोन?
 
धायरीतील कारवाई सुरू असताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सोमनाथ बनकर उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका प्लांटचालकाने बनकर यांच्या वाहनासमोर स्वतःची गाडी लावली आणि एका मंत्र्याला फोन करून तो बनकर यांच्याकडे दिला. त्यानंतर संबंधित मंत्र्याने कारवाई थांबविण्याची सूचना केल्याचा दावा करण्यात येत आहे.

Related Articles