सिंधू आणि लक्ष्यची विजयी सलामी   

हायलो ओपन स्पर्धा; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

सारब्रुकेन (जर्मनी) : जर्मनीत सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ हायलो ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी बुधवारी दमदार कामगिरी केली. पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांनी सलामीच्या लढती जिंकत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. किरण जॉर्ज, उन्नती हुड्डा, ईशरानी बरुआ आणि अनमोल खरब यांनीही विजय मिळवत पुढील फेरी गाठली. मात्र, अनुभवी एच. एस. प्रणॉयसह काही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. महिला एकेरीत दुसरे मानांकन असलेल्या पी. व्ही. सिंधूने शानदार खेळ करत संयुक्त अरब अमिरातीच्या प्रकृती भरतचा सरळ गेममध्ये 21-10, 21-10 असा पराभव केला. ही लढत अवघ्या 28 मिनिटांत संपली. गेल्या आठवड्यात फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावणार्‍या सिंधूने हायलो ओपनमध्येही आपला दमदार फॉर्म कायम राखला. सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत तिने प्रतिस्पर्धी खेळाडूला फारशी संधी दिली नाही.

Related Articles