‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्याला सीजेपीचा पाठिंबा   

नवी दिल्ली : इंडिया आघाडीने १ नोव्हेंबर रोजी राजधानी दिल्लीत मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच, मतदार यादी विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) प्रकियेवरुन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला.
 
एसआयआरच्या नावाखाली पात्र मतदारांना वगळले जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. याबद्दल सीजेपीनेदेखील चिंता व्यक्त केली आहे. मोदी आणि शहा यांच्या इशार्‍यावर निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोपदेखील विरोधकांकडून वारंवार केला जात आहे. निवडणूक आयोगाची विश्वासाहार्ता पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आवश्यक असल्याचे सीजेपीने निवेदनात म्हटले आहे. 
 
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे ‘इंडिया’ आघाडीच्या मेळाव्याला पाठिंबा व्यक्त केला. तसेच, ज्ञानेश कुमार यांना जावेच लागेल, असे म्हटले आहे. प्रत्येक पात्र नागरिकाच्या मतदानाच्या अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी आयोगाची असून, त्यांनी हा अधिकार बजावताना कोणतेही अडथळे निर्माण करू नयेत, असेही सीजेपीने म्हटले आहे.
 
राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. कोणताही पात्र नागरिक या अधिकारापासून वंचित राहणार नाही, याची खात्री करणे ही आयोगाची जबाबदारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 

Related Articles