कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का   

एकही जागा नाही!

बंगळुरु : कर्नाटक विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विरोधी पक्ष धर्मनिरपेक्ष जनता दलाने सत्ताधारी काँग्रेसकडून एक जागा हिसकावून घेतली. तर, भाजपने तीन जागा कायम ठेवल्या. काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळविता आला नाही.धर्मनिरपेक्ष जनता दलाने बंगळुरु शिक्षक मतदारसंघ काँग्रेसकडून हिसकावून घेतला. भाजपने ईशान्य शिक्षक, दक्षिण-पूर्व पदवीधर, पश्चिम पदवीधर मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला. 
 
या निकालाचा कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर फारसा परिणाम होणार नसला तरी भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल युतीची ताकद वाढल्याचे स्पष्ट होते. बंगळुरू शिक्षक आणि ईशान्य शिक्षक मतदारसंघांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले होते. तर उर्वरित दोन मतदारसंघांतील मतमोजणी रात्रभर सुरू होती. या चारही विधान परिषद जागांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते.
 
बंगळुरु शिक्षक मतदारसंघात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे उमेदवार ए. पी. रंगनाथ यांनी काँग्रेसचे विद्यमान विधान परिषद सदस्य पुट्टन्ना यांचा ९०८ मतांनी पराभव केला. रंगनाथ यांना १०,८१० मते मिळाली. तर पुटन्ना यांना ९,९०२ मते मिळाली. ईशान्य शिक्षक मतदारसंघात भाजप उमेदवार शशिल जी. नमोशी यांनी काँग्रेस उमेदवार शरणप्पा मत्तूर यांचा पराभव केला. या मतदारसंघातून त्यांनी पाचव्यांदा विजय मिळविला. या मतदारसंघात कलबुर्गी आणि कल्याण कर्नाटकचा जिल्ह्याचा समावेश आहे. कलबुर्गी हा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा बालेकिल्ला मानला जातो.  नमोशी यांनी मत्तूर यांचा ३,२९७ मतांनी पराभव केला. नमोशी यांना १५,५९६ मते पडली. मत्तूर यांना १२,२९९ मतांवर समाधान मानावे लागले.
 
दक्षिण पूर्व पदवीधर मतदारसंघात भाजप उमेदवार के.एम. सुरेश यांनी काँग्रेस उमेदवार शशी हलिकुंटे मठ यांचा २३,०९८ मतांनी पराभव केला. सुरेश यांना ६६,०२० मते मिळाली. तर, मठ यांना ४२,९२२ मते मिळाली.
 
पश्चिम पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार एस.व्ही. संकनूर यांनी काँग्रेस उमेदवार मोहन लिंबिकाई यांचा ९,३२३ मतांनी पराभव केला. संकनूर यांना ३३,७११ मते मिळाली, तर मोहन यांना २४,३८८ मते मिळाली.
 
कर्नाटक विधान परिषद सदस्य संख्या ७५ असून, यात काँग्रेसचे ३८, भाजपचे २४, धर्मनिरपेक्ष जनता दलाचे ६ सदस्य असून एक अपक्ष सदस्य आणि सभापती सलीम अहमद यांचा समावेश आहे. 

Related Articles