साहित्य महामंडळाच्या कामकाजाचे काय होणार?   

अविश्‍वास ठराव; तांत्रिक मुद्दे दूर न झाल्यास बैठका लांबण्याची शक्यता

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांवर कार्यकारी मंडळाने अविश्‍वास ठराव मांडला आहे. मात्र प्रमुख पदाधिकारी हेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी आहेत. त्यामुळे त्याचा थेट परिणाम महामंडळाच्या कामकाजावर होणार आहे. वेळेत अविश्‍वास ठरावावर तोडगा न निघाल्यास महामंडळाच्या नियोजित बैठका पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
येत्या 23 नोव्हेंबर रोजी महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची, तर 24 नोव्हेंबर रोजी महामंडळाची बैठक होणार आहे. याच बैठकीत शंभराव्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. त्यामुळे या नियोजित बैठकीचे काय होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद आणि विदर्भ साहित्य संघ या साहित्य महामंडळाच्या घटक संस्था आहेत. महामंडळाचे फिरते कार्यालय तीन वर्षांसाठी साहित्य परिषदेकडे आहे. घटक संस्थेचे प्रमुख पदाधिकारी महामंडळाचे प्रमुख असतात. या नियमानुसार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर हे महामंडळाचेही प्रमुख आहेत. या तीन प्रमुख पदाधिकार्‍यांवर परिषदेच्या कार्यकारी मंडळाने अविश्‍वास ठराव आणला. साहित्य परिषदेतील हा पेचप्रसंग तर दुसरीकडे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम सप्रे यांची निवड वैध नसल्याचा आरोप साहित्य महामंडळाची समाविष्ट संस्था मध्यप्रदेश मराठी साहित्य संघाचे सचिव मोहन रेडगांवकर यांनी केल्याने महामंडळाचे काम कसे चालणार, असा प्रश्‍न महामंडळाच्या सदस्यांमध्ये चर्चिला जात आहे.
 
घटनेनुसार ज्यांच्या विरोधात अविश्‍वास ठराव मांडण्यात आला आहे. त्यांना पंधरा दिवसांत बाजू मांडण्याची संधी द्यावी लागणार आहे. मात्र पदाधिकारी बाजू मांडणार की धर्मादाय आयुक्त किंवा न्यायालयात धाव घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विद्यमान पदाधिकारी धर्मादाय आयुक्त किंवा न्यायालयात गेल्यास या गोष्टीचा खुप वेळ जाणार आहे. तोपर्यंत मात्र साहित्य महामंडळाचे काम ठप्प होऊ शकते. त्यामुळे सद्य:स्थितीत तरी साहित्य महामंडळाच्या सदस्यांत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.
 
कामकाजावर कोणताही परिणाम नाही 
 
अविश्‍वासाचा ठराव दिला म्हणजे तो मान्य होतो असे नाही. त्यानंतर पदाधिकार्‍यांना बाजू मांडण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ द्यावा लागतो. त्यानंतर पुढील पंधरा दिवसांत बैठक बोलावली जाईल, त्या बैठकीत ठरावावर चर्चा होईल. आम्ही याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहोत. आमच्या कामकाजावर  कोणताही परिणाम झालेला नाही. ठरलेल्या बैठकाही नियोजनानुसार पार पडतील. 
- डॉ. स्वाती महाळंक, प्रमुख कार्यवाह, मसाप
 
बैठकीपर्यंत तांत्रिक मुद्दे दूर होतील 
 
साहित्य महामंडळाची बैठक 23 नोव्हेंबर रोजी आहे. बैठकीला आणखी अवधी आहे. तोपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषनेत निर्माण झालेले तांत्रिक मुद्दे दूर होतील. तसे झाल्यास ठरल्याप्रमाणे बैठक पार पडू शकते. अन्यथा काही काळासाठी ही बैठक पुढे ढकलावी लागेल. कारण जोपर्यंत तांत्रिक मुद्दे दूर होणार नाहीत, तोपर्यंत संभ्रमाची स्थित असणार आहे. 
- डॉ. रामचंद्र काळुंखे, सदस्य, साहित्य महामंडळ 

Related Articles