सुसमधील खड्डा आणि चेंबर दुरुस्त करा   

पुणे : पाषाण येथील सुस रस्त्यावर एकतानगरमध्ये जाणार्‍या मार्गावरील चेंबरशेजारी अनेक महिन्यांपासून मोठे भगदाड पडले आहे. तसेच, सुस रस्त्यावरील वाकेश्‍वर चौकातील बसथांब्याजवळ पावसाळी गटारावरील चेंबरचे झाकण गेल्या आठ दिवसांपासून गायब आहे. या दोन्ही ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असल्याने तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. यावेळी मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्यासह सज्जन नरवडे, विजय ढाकणे, संतोष रोडगे, रणजीत गिलबिले, किशोर इंगवले उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत दुरुस्ती न झाल्यास महापालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या संदर्भात मनसेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदन देण्यात आले. एकतानगरमध्ये जाणार्‍या रस्त्यावरील चेंबरशेजारी पडलेल्या भगदाडात मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली आहे. त्यामुळे रस्त्याचा भाग खचण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, वाकेश्वर चौकातील बसथांब्याजवळ पावसाळी गटारावरील चेंबरचे झाकण नसल्याने सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Related Articles