अहमदाबादमधील बॉम्बच्या धमक्या बांगला देश आणि पाकिस्तानातून   

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमसह विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याबाबतच्या धमक्यांचे ई-मेल नुकतेच मिळाले होते. ही ई-मेल खाती बांगला देश आणि पाकिस्तानातून हाताळली गेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती अधिकार्‍यांनी बुधवारी  दिली.सायबर गुन्हे शाखेने याबाबत प्रसिद्धीपत्रक बुधवारी जारी केले. हॅक केलेली ई-मेल खाती विकणारी एक टोळीदेखील उघडकीस आली आहे. 
 
मध्यंतरी, गुजरात पोलिसांनी पश्चिम बंगालमधून एका आरोपीला अटक केली होती. त्याने हॅक केलेली खाती बांगलादेशातील एका व्यक्तीला विकली होती. त्यानंतर, त्या व्यक्तीने ती खाती पाकिस्तानातील एक़ा व्यक्तीला क्रिप्टोकरन्सीच्या बदल्यात विकली होती.
 
७ ऑक्टोबर रोजी दोन ई-मेल आयडीवरुन काही ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली. यामध्ये १० शाळा, गुजरात उच्च न्यायालय, अहमदाबादमधील इतर न्यायालये आणि नरेंद्र मोदी स्टेडियमचा समावेश होता. या ईमेलमध्ये ’खलिस्तान’चा उल्लेख होता. दिल्लीत १ नोव्हेंबर रोजी होणार्‍या गायक दिलजित दोसांजच्या कार्यक्रमात, तसेच २१ नोव्हेंबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार्‍या त्याच्या कार्यक्रमात स्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली होती.
 
ही ईमेल खाती बांगलादेश आणि पाकिस्तानमधील रावळपिंडी येथून हाताळली गेली होती, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.२७ ऑक्टोबर रोजी अशाच प्रकारे एका ई-मेलवरुन अहमदाबादमधील १४ शाळा, सरकारी कार्यालये, न्यायालये आणि नरेंद्र मोदी स्टेडियमसह एकूण १९ ठिकाणांना लक्ष्य करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली होती. या संदेशातही ’खलिस्तान’चा उल्लेख होता. हे खाते बांगलादेशातील रंगपूर आणि पाकिस्तानमधील लाहोर येथून हाताळले गेले होते.
 

Related Articles