शेट्टी, खोत यांचे अटक वॉरंट रद्द   

साखर संकुल तोडफोड प्रकरणात दिलासा

पुणे : शेतकर्‍यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शिवाजीनगर येथील साखर संकुल येथे 2015 मध्ये झालेल्या आंदोलनावेळी तोडफोड झाल्याप्रकरणी न्यायालयीन सुनावणीस हजर न राहिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याविरोधात काढण्यात आलेले अटक वॉरंट न्यायालयाने बुधवारी रद्द केले. सत्र न्यायाधीश अनिरुद्ध गांधी यांनी हा आदेश दिला.
 
या प्रकरणात सुमारे 150 जणांविरोधात गुन्हा दाखल असून, त्यापैकी सुमारे 90 आरोपी आज न्यायालयात हजर झाले. न्यायालयात हजर झालेल्या शेट्टी, खोत यांच्यासह अन्य आरोपींना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच आरोप निश्चितीच्या तारखेपर्यंत प्रत्येक सुनावणीला आरोपींनी प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. या वेळी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या वतीने ड. योगेश पांडे यांनी न्यायालयात बाजू मांडली.दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने 2018 मध्ये ऊसदर आंदोलनाशी संबंधित खटले मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या संदर्भातील सरकारचे पत्र न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानंतर अद्याप हा खटला मागे घेण्यात आला नसल्याचे ड. पांडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले.
 
दोन महिन्यांपूर्वी काढले होते वॉरंट
 
या प्रकरणाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने दोन महिन्यांपूर्वी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह इतर आरोपींच्या विरोधात अटक वॉरंट काढले होते. दोघांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश शिवाजीनगर पोलिसांना देण्यात आले होते. मात्र, सुनावणीदरम्यान दोघेही न्यायालयात हजर राहिल्याने त्यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आले.
 
आंदोलनाला हिंसक वळण
 
ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊसदराची थकीत रक्कम आणि रास्त व किफायतशीर दराप्रमाणे (एफआरपी) पैसे मिळावेत, या मागणीसाठी 2015 मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली साखर संकुल येथे आंदोलन करण्यात आले होते. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. साखर आयुक्तांची भेट न झाल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी साखर संकुलाच्या इमारतीत प्रवेश करून तोडफोड केली होती, त्यामध्ये फुलदाण्या, काचा, खिडक्या तसेच फर्निचरचे नुकसान झाले होते; तसेच तळमजल्यावर उभ्या वाहनाला आग लावण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यासह सुमारे 150 जणांविरोधात शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Related Articles