फटाका स्टॉल्सच्या लिलावातून महापालिकेला 46 लाखांचे उत्पन्न   

56 स्टॉल्स अजूनही बोलीच्या प्रतिक्षेत

पुणे : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महानगरपालिकेने फटाका विक्री स्टॉल्ससाठी आयोजित केलेल्या ऑनलाइन लिलावातून यंदा 45 लाख 83 हजार 34 रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. शहरातील 13 ठिकाणी 184 स्टॉल्ससाठी लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी 128 स्टॉल्सचा लिलाव यशस्वी झाला असून, 56 स्टॉल्सना बोलीदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. या शिल्लक स्टॉल्सच्या विक्रीसाठी महापालिका प्रशासनाकडून पुन्हा ऑनलाइन लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महापालिकेच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे.
 
महापालिकेने यंदा फटाका स्टॉल्सच्या जागांसाठी ऑनलाइन लिलाव आयोजित केला होता. या प्रक्रियेत 152 जणांनी सहभाग नोंदविला. प्रत्येक स्टॉलसाठी 34 हजार रुपये आधारभूत किंमत (बेस प्राइस) निश्चित करण्यात आली होती. त्यावर सहभागी बोलीदारांनी बोली लावली. यंदाच्या लिलावात एका स्टॉलसाठी सर्वाधिक 98 हजार रुपयांची बोली लागली. स्टॉलच्या बोलीची रक्कम, त्यावरील 18 टक्के जीएसटी आणि एक हजार रुपये स्वच्छता शुल्क यांचा समावेश करून महापालिकेच्या तिजोरीत 45 लाख 83 हजार 34 रुपये जमा झाले आहेत. शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ नदीकाठावर असलेल्या फटाका स्टॉल्सना यंदाही बोलीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला. येथील 40 स्टॉल्ससाठी 49 जणांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यामुळे या परिसरातील स्टॉल्ससाठी चुरस पाहायला मिळाली.शनिवार पेठेतील रिव्हरसाइड परिसरासह कोंढवा खुर्द येथील अग्निशमन केंद्र, हडपसर, धानोरी, कोथरूड, कात्रज, पर्वती, धायरी, खराडी, बालेवाडी, हडपसर येथील सीझन मॉल, वारजे येथील आरएमडी कॉलेज आणि लोहगाव या 13 ठिकाणी फटाका विक्री स्टॉल्ससाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती.

Related Articles