वाढती आर्थिक विषमता गंभीर समस्या   

सरकारने पावले उचलावीत; काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली : ’वाढती आर्थिक विषमता’ ही देशातील सर्वात गंभीर समस्यांपैकी एक आहे. महागाई आणि प्राप्ती यांचा तळमेळ घालताना सामान्य नागरिकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे सरकारने त्याबाबत पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी सरकारकडे  केली. सरकारने आर्थिक संकटाच्या वास्तवाचा स्वीकार करावा, रोजगाराच्या संधी वाढवाव्यात आणि महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन केले. 
 
आर्थिक विकासाचे दावे तेव्हाच अर्थपूर्ण ठरतात जेव्हा त्याचे फायदे सामान्य माणसापर्यंत पोहोचतात; अन्यथा, ही आकडेवारी प्रगतीची नव्हे, तर वाढत चाललेल्या आर्थिक दरीची साक्ष देते, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले. ’एक्स’ वर त्यांनी एक माध्यम अहवाल टाकला आहे. त्यानुसार जरी कुटुंबांनी बँक ठेवी, म्युच्युअल फंड आणि इतर वित्तीय मालमत्तांमध्ये अधिक गुंतवणूक केली असली, तरी त्यांच्यावरील ’नवीन कर्ज’ अधिक वेगाने वाढले आहे. परिणामी, २०२५-२६ या आर्थिक वर्षात कुटुंबांची निव्वळ आथिंक बचत सुमारे ४ टक्क्यांनी घटून २१.६९ लाख कोटी रुपयांवर आली आहे. मागील वर्षी ती २२.५७ लाख कोटी रुपये होती.
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही  केंद्र सरकारवर टीका केली. सरकार मतदानासह आता जगण्याचा अधिकारही काढून घेत आहे, असा आरोप  त्यांनी केला. खर्गे यांनी ’एक्स’वरील हिंदीतील पोस्टमध्ये म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात, कंबर तोडणारी महागाई नागरिकांचा कमाईचा प्रत्येक पैसा गिळंकृत करत आहे. अन्नधान्याची महागाई २.१३ टक्क्यांवरुन आता ७.७४ टक्क्यांवर पोहोचली आहे; कौटुंबिक कर्ज ३६.७ टक्के वाढले. या वाढीचा वेग तिप्पट आहे. कौटुंबिक बचत ४ टक्के घटली असून किरकोळ महागाई  ५.५४ टक्के तर घाऊक महागाई ११.३९ टक्क्यांवर पोहोचली आहे, असे त्यांनी सांगितले.
 

Related Articles