शेतकरी मदतीच्या निकषात २४ तासांत बदल   

करदाते, लोकप्रतिनिधी, सरकारी कर्मचारी मदतीसाठी पात्र

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यातील दुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यांतील सुमारे दीड कोटी शेतकर्‍यांना हंगामी मदत म्हणून प्रत्येकी पाच हजार देण्याच्या निकषात राज्य सरकारने बुधवारी बदल केले. त्यानुसार, आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरकारी, निमसरकारी कर्मचारी तसेच प्राप्तिकर भरणार्‍या व्यक्ती मदतीसाठी पात्र ठरवण्यात आल्या आहेत. मात्र, शेतीच्या ३३ टक्के नुकसानीची अट कायम ठेवण्यात आली आहे. मदत आणि पुनर्वसन विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला.
 
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या  बैठकीत दिवाळीपूर्वी सर्व पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यात पाच हजारांची मदत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन दिवसांत ही मदत जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. 
 
यासाठी  लागणार्‍या ७ हजार ५०० कोटींच्या  निधीला मंत्रिमंडळाने  मान्यता दिली आहे. मात्र, सरकारने या हंगामी मदतीसाठी कर्जमुक्तीचे निकष लावले होते. त्यानुसार, सुरुवातीला आजी-माजी लोकप्रतिनिधी, २५ हजारांपेक्षा अधिक वेतन, सेवानिवृत्ती वेतन घेणारे सरकारी- निमसरकारी कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी,  अनुदानित संस्थांचे अधिकारी तसेच  कर्मचारी, शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून प्राप्तिकर भरणार्‍या व्यक्ती, कृषि उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाने, सहकारी सूतगिरण्या, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक आदींना मदतीपासून अपात्र ठरवले होते.
 
परंतु,मदतीसाठी पात्र-अपात्र अशी छाननी लावण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने सरकारने मदतीच्या अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता शेत पिकाचे  ३३ टक्क्यांहून अधिक  नुकसान झालेल्या सर्व शेतकर्‍यांना मदत मिळणार आहे.
 

Related Articles