पुण्यातील महात्मा फुले स्मारकासाठी २३० कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी   

ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर महसूल मंत्र्यांची माहिती

मुंबई, (प्रतिनिधी) : महात्मा जोतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाडा परिसराच्या संपूर्ण विकासासाठी २३० कोटींच्या विकास प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रस्तावातून फुलेवाडा परिसराचे सुशोभीकरण करण्यासोबतच आवश्यक जमीन संपादन करून संपूर्ण परिसराचा कायापालट केला जाणार असल्याची माहिती मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली.
 
मंत्रिमंडळ ओबीसी उपसमितीची  विशेष बैठक काल मंत्रालयात पार पडली. या बैठकीत महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त बहुजन आणि इतर मागास प्रवर्गाच्या कल्याणासाठी अनेक धोरणात्मक निर्णय जाहीर करण्यात आले. ऐतिहासिक भिडेवाडा येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या मुलींच्या शाळेचे स्मारक उभारणीचे काम येत्या तीन आठवड्यांत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. यासोबतच महसूल, पाणीपुरवठा आणि वनविभागासह दुष्काळ निवारणावर काम करणार्‍या ११ प्रमुख विभागांच्या सर्व कल्याणकारी उपाययोजना जोतिबा फुले यांच्या नावाने राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

३६ जिल्ह्यांमध्ये ओबीसी वसतिगृहे

राज्यभरातील इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती देण्यासाठी ३६ जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी ५०० क्षमतेची ओबीसी वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी महसूल विभागामार्फत अवघ्या एक रुपया नाममात्र दराने जमीन उपलब्ध करून दिली जाणार असून, एमएसआयडीसीने या वसतिगृहांचे अधिकृत डिझाईन तयार केले आहे. तसेच, भटक्या आणि विमुक्त जातींना विकासनिधीचा थेट लाभ मिळावा, यासाठी ओबीसी अंदाजपत्रकातून व्हीजेएनटीचे अंदाजपत्रक वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात होणार्‍या अधिवेशनात अर्थ विभागाकडे या स्वतंत्र अंदाजपत्रकासाठी तरतूद मागितली जाणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले.
 
मराठा समाजासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीच्या धर्तीवर व्हीजेएनटी समाजाची सामाजिक आणि  आर्थिक पाहणी करण्यासाठी तसेच त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एक स्वतंत्र अभ्यास समिती स्थापन केली जाणार आहे. याशिवाय, सर्व शासकीय विभागांमधील ओबीसी प्रवर्गातील २७ टक्के रिकाम्या पदांचा अनुशेष तातडीने भरण्यासाठी पावले उचलली जातील. ’सारथी’च्या धर्तीवर ’महाज्योती’ संस्थेची व्याप्ती वाढवून अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
 

Related Articles