गाळ हटणार, पाणीसाठा वाढणार   

आळेतील बंधार्‍याच्या खोलीकरणाला सुरुवात 

बेल्हे, (वार्ताहर) : पावसाचे पाणी अडवून त्याचा शेतीसाठी अधिकाधिक उपयोग व्हावा, यासाठी आळे येथे जलसंधारणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. उकळीच्या महादेव मंदिराजवळील सिमेंट बंधार्‍यात साचलेला गाळ काढून त्याची खोली वाढविण्याच्या कामास नुकताच प्रारंभ झाला.
 
आयटीसी मिशन सुनहरा कलच्या कृष्णा खोरे जल संसाधन व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर(डीएससी) यांच्या पुढाकारातून हे काम हाती घेण्यात आले आहे. बंधार्‍यातील गाळ काढल्यानंतर पाणीसाठ्याची क्षमता वाढणार असून, त्याचा थेट फायदा परिसरातील शेतीला होण्याची अपेक्षा आहे.
 
पाणी अडविण्याची क्षमता वाढल्याने पावसाळ्यानंतरही अधिक काळ पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होणार आहे. तसेच पाण्याचा जमिनीत होणारा मुरवा वाढल्याने भूजल पातळीत सुधारणा होऊन विहिरी व बोअरवेलच्या पाण्यालाही त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सिंचनासाठी उपलब्ध होणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढण्यास हातभार लागणार आहे. कामाच्या प्रारंभी प्रकल्प अभियंता संदेश पाटील यांनी जलसंधारण, पाण्याचे नियोजन आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन याबाबत माहिती दिली. प्रकल्प व्यवस्थापक दिग्विजय शर्मा यांनी जलसंधारणाची कामे केवळ बांधकामापुरती मर्यादित न ठेवता त्याचा शेतकर्‍यांना दीर्घकालीन लाभ मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
 

Related Articles