आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा; श्रीरामपूरकरांत संताप   

श्रीरामपूर (वार्ताहर) : नगरपरिषदेने शहरात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा करण्याचे जाहीर केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन सेना, लहुजी सेना आदी संघटनांनी निदर्शने करून मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांना निवेदन दिले.
 
रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी पाणी-पुरवठ्याचे नियोजन, तलावाच्या कामातील विलंब आणि पर्यायी व्यवस्थेवरून प्रशासनाला धारेवर धरले. नागरिकांना किमान दिवसाआड पाणीपुरवठा करावा; अन्यथा नगराध्यक्ष करण ससाने यांच्या घरावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला.
 
मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होत असून, साठवणुकीसाठी ड्रम खरेदी करताना गर्दी व वाद होत असल्याचे सांगितले. रमादेवी धीवर यांनी सिद्धार्थनगर, भीमनगर, अचानकनगर आणि पंचशीलनगर येथे तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

आज लाक्षणिक उपोषण

आठ दिवसांनी पाणीपुरवठ्याच्या निर्णयाविरोधात ‘व्याकूळ श्रीरामपूरकर’तर्फे आज (गुरुवारी) नगरपालिका कार्यालयासमोर उपोषण होणार आहे. संजय छल्लारे, रविंद्र गुलाटी, शशांक रासकर, राजेश अलघ, सचिन बडदे, अर्जुन कर्पे, तिलक डुंगरवाल, रूपेश हरकल, शंकर चव्हाण, योगेश ओझा व केतन खोरे यांनी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले.
 

Related Articles