कुमकुमला महिला वैयक्तिक रिकर्वमध्ये विजेतेपद   

आयची-नागोया : कुमकुम मोहोडने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 17वे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने महिला वैयक्तिक रिकर्वच्या अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या येजिन ओहचा शूट-ऑफमध्ये पराभव करून सुवर्णपदकावर नाव कोरले. कुमकुमने अंतिम फेरीत 6-5 असा विजय मिळवला. या विजयासह तिने 1978 पासून सुरू असलेला 48 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. महिला वैयक्तिक रिकर्वमध्ये भारताचे हे पहिलेच पदक ठरले.
 
अंतिम फेरीत कुमकुम एका क्षणी दोन सेटनंतर 3-1 अशी पिछाडीवर होती. त्यानंतर तिने जोरदार पुनरागमन करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. येजिनने पुन्हा 5-3 अशी आघाडी घेतली; मात्र निर्णायक पाचव्या सेटमध्ये दबाव असतानाही कुमकुमने सलग तीन अचूक 10 गुणांचे बाण मारत सामना 5-5 असा बरोबरीत आणला. त्यामुळे सामना शूट-ऑफमध्ये गेला. येजिनने आपल्या एकमेव बाणावर 8 गुण मिळवले, तर कुमकुमने अचूक 10 गुण मिळवत शूट-ऑफ जिंकला आणि भारताच्या खात्यात 17वे सुवर्णपदक जमा केले.
 
कुमकुमचे दुसरे सुवर्ण, तिसरे पदक
 
आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील कुमकुमचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने अंकिता भकत आणि कीर्ती शर्मा यांच्यासह महिला रिकर्व सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय शुक्रवारी धीरज बोम्मदेवरा याच्यासोबत मिश्र रिकर्वमध्ये तिने रौप्यपदक मिळवले होते. तिरंदाजीतील हे भारताचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पाचवे सुवर्णपदक आहे. भारतीय तिरंदाजांनी आतापर्यंत एकूण आठ पदके जिंकली असून त्यात पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे.1978 मध्ये सुरू झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या महिला वैयक्तिक रिकर्व प्रकारात 2026 पर्यंत भारताच्या कोणत्याही महिला तिरंदाजाला पदक जिंकता आले नव्हते. कुमकुमने हा सिलसिला मोडत या स्पर्धेतील भारताचे पहिले पदक आणि पहिलेच सुवर्णपदक मिळवून दिले.

Related Articles