‘पे अँड पार्क’च्या नावाखाली नागरिकांना भुर्दंड   

नागरिकांसाठी मोफत पार्किंगची ऋषिकेश कानवटे यांची मागणी; आंदोलनाचा इशारा
 
पिंपरी : पुणे महानगरपालिकेच्या औंध-बाणेर-बालेवाडी क्षेत्रीय कार्यालयात विविध प्रशासकीय कामे, तक्रारी व दाखल्यांसाठी येणार्‍या नागरिकांकडून पार्किंग शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आम आदमी पार्टी युवा आघाडीचे ऋषिकेश कानवटे यांनी केला आहे. शासकीय कामासाठी येणार्‍या नागरिकांना पार्किंग शुल्कातून सूट देऊन मोफत पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कानवटे म्हणाले, महानगरपालिकेतील विविध कामांसाठी नागरिकांना अनेकदा कार्यालयात ये-जा करावी लागते. अशा परिस्थितीत आपल्या हक्काच्या कामासाठी येणार्‍या नागरिकांकडून पार्किंग शुल्क आकारणे अन्यायकारक आहे. 
 
क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात अधिकारी व कर्मचार्‍यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध असताना सामान्य नागरिकांकडून शुल्क का आकारले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मागण्यांची तातडीने दखल घेऊन नागरिकांना मोफत पार्किंग उपलब्ध करून न दिल्यास औंध क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऋषिकेश कानवटे यांनी दिला आहे.
 
प्रमुख मागण्या :
 
* औंध क्षेत्रीय कार्यालयाच्या आवारात शासकीय व प्रशासकीय कामासाठी येणार्‍या सर्वसामान्य नागरिकांसाठी तात्काळ ’मोफत पार्किंग व्यवस्था’ अमलात आणावी.
* ठेकेदाराच्या नियमांत सुधारणा करून तक्रारदार व अभ्यागतांना पार्किंग शुल्कातून पूर्ण सूट देण्यात यावी.
* सरकारी इमारती ही ’नागरी सेवा केंद्र’ असून ती व्यवसायाचे ठिकाण बनवू नयेत.  

Related Articles