इन्स्टाग्रामवरील साडीची जाहिरात पाहून ऑनलाइन खरेदी पडली महागात   

तरुणीची 1 लाख 19 हजारांची फसवणूक

पिंपरी : इन्स्टाग्रामवर साडीची जाहिरात पाहून ऑनलाइन खरेदी करण्याचा प्रयत्न करणार्‍या 27 वर्षीय तरुणीची 1 लाख 19 हजार 209 रुपयांची फसवणूक झाली. साडी पाठविण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने फिर्यादीकडून पैसे घेतल्यानंतर पुन्हा रक्कम पाठविण्याचे सांगत तिची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी 27 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
फिर्यादी इन्स्टाग्राम पाहत असताना एका खात्यावर साडी विक्रीसंदर्भातील मनीष मॅनफॅक्चर या कपड्यांच्या दुकानाच्या रिल्स दिसल्या. त्यामध्ये दाखविण्यात आलेली एक साडी फिर्यादीला पसंत पडल्याने त्यांनी साडीबाबत चौकशी करण्यासाठी रिल्समध्ये दिलेल्या 8306067698 या व्हॉट्सप क्रमांकावर संदेश पाठविला. त्यानंतर पैसे पाठविल्यावर संबंधित व्यक्तीने व्हॉट्सप कॉल करून फिर्यादीला त्यांनी पाठविलेली 1 लाख 19 हजार 209 रुपये 11 पैसे इतकी रक्कम परत पाठविणार असल्याचे सांगितले. त्यासाठी जीएसटी भरण्याच्या नावाखाली आणखी 16 हजार 706 रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. साडी पाठविण्याच्या बहाण्याने अज्ञात व्यक्तीने पैसे घेऊन ते परत देण्याचे सांगत 1 लाख 19 हजार 209 रुपयांची 
फसवणूक केली.

Related Articles