ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबई, दिल्लीत आंदोलन   

सीजेपीच्या आंदोलनाने शिवाजी पार्क दणाणले

मुंबई, (प्रतिनिधी) : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी पोलिसांचा मनाई आदेश धुडकावून कॉक्रोच जनता पार्टीने शुक्रवारी शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन केले. यावेळी विविध घोषणांनी शिवाजी पार्क मैदान दणाणून गेले होते. दरम्यान, शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीचे आंदोलन सुरू असताना बाहेरच्या बाजूला २० ते २५ तरुणांनी ’जय श्रीराम’च्या घोषणा देण्यास सुरुवात केल्याने गोंधळ उडाला होता. परंतु, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत या टोळक्याला बाहेर नेल्याने अनुचित प्रकार टळला.
 
२०२४ पासून एसआयआरच्या माध्यमातून देशातील १३ कोटी मतदारांची नावे  यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक आयोग एका पक्षाच्या फायद्यासाठी काम करत आहे. आमच्या मताची चोरी झाली आहे. राज्यघटनेने दिलेला आमचा मताचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे देशातील लोकशाही वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची तात्काळ हकालपट्टी होणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलनाची सुरुवात मुंबईपासून सुरू करत असून, राजीनामा देईपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असे सांगत अभिजित दिपके यांनी ‘चलो जंतर-मंतर’ ची घोषणा दिली. मुख्य निवडणूक आयुक्त  ज्ञानेश कुमार यांची पक्षपाती भूमिका व एसआयआरच्या माध्यमातून मतदार यादीतील लाखो नावे वगळण्याच्या कारस्थानाविरोधात सध्या देशभर आंदोलने सुरू आहेत. कॉक्रोच जनता पार्टीने शिवाजी पार्कवर मैदानावर गांधी जयंती दिनी आंदोलन करण्याची घोषणा केली होती. आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परंतु, हा बंदी आदेश धुडकावून कॉक्रोच जनता पार्टी तेथेच आंदोलन केले. 
   
आंदोलनाला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. नसरुद्दीन शाह, शबाना आझमी, विशाल भारद्वाज, शर्लिन चोपडा, गायक विशाल ददलानी, महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी अशा अनेक ज्येष्ठांनी या आंदोलनाला हजेरी लावली. 
 
यावेळी बोलताना अभिजीत दीपके यांच्यासह सर्वच नेत्यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली. देशातील लोकशाहीच्या रक्षणासाठी आंदोलन करणे, राज्यघटनेने दिलेल्या अधिकारासाठी लढणे यापेक्षा मोठी श्रद्धांजली महात्मा गांधी यांना असू शकत नाही. आपल्या अधिकारांसाठी लढणे यापेक्षा मोठी श्रद्धांजली गांधीजींना असू शकत नाही. गांधीजींना जितका त्रास इंग्रजांनी दिला नसेल तेवढा त्रास सध्याचे  सरकार आम्हाला देत आहे. दिल्लीत लहान मुलांवर लाठीमार करण्यात आला. परंतु, आमचा लढा थांबला नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. आता लोकशाही वाचवण्यासाठी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. 
 
आंदोलन केले तर तीन दिवस कारागृहात जावे लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आमची तीन दिवस नाही, तर तीन महिने कारागृहात जाण्याची तयारी आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही पुन्हा रस्त्यावर येऊ, असा इशारा दिपके यांनी दिला. दीपके यांनी आपल्या भाषणात मुंबई पोलिसांचे कौतुक केले. मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पोलिस ठाण्यात नेल्यानंतर काही काळानंतर ते बाहेर आले. या घटनेनंतर त्यांना अटक झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या; मात्र, मुंबई पोलिसांनी अटक केलेली नव्हती. ‘मुंबई पोलिस हे देशातील सर्वोत्तम पोलिस आहेत, अशी प्रशंसा दिपके यांनी केली. दिल्ली पोलिसांवर मात्र त्यांनी टीका केली. दिल्लीचे पोलिसअधिकारी सचिन शर्मा अमित शाह यांचा जनरल डायर आहे. छोट्या मुलांना मारहाण करणार्‍या जनरल डायरसारखी भूमिका बजावत असून, दिल्लीमध्ये आंदोलन करणार्‍यांना फरफटत नेले जात असल्याचा दावा त्यांनी केला.
 
खोट्या कथनाला यश मिळणार नाही : फडणवीस
 
तिन्ही निवडणूक आयुक्तांनी एकत्र पत्रकार परिषद घेतल्याने विरोधकांच्या ‘फेक नरेटिव्ह’चा पर्दाफाश झाला आहे. खोट्या कथनाला आता यश मिळणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले.
 
आतिशी, संजयसिंह यांसह ७०० जण ताब्यात
 
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात शुक्रवारी जंतर-मंतरवर आंदोलन करणारे आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज, संजीव झा, आतिशी आणि संजय सिंह यांसह ७०० हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश होता.
 
मतदारांची विशेष तीव्र पडताळणी (एसआयआर) मोहिमेतील कथित अनियमितता आणि मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध राजकीय पक्षांसह एआयएसए, एसएफआय, एनएसयूआय व इतर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत. 
 
’आप’चे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय सिंह यांना नॉर्थ व्हेन्यू येथे आंदोलनस्थळी जाण्यापासून रोखण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.शांततापूर्ण आंदोलन करत असताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले, असे भारद्वाज यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी आंदोलन सुरू ठेवावे आणि जंतर-मंतरवर पोहोचावे, असे आवाहन केले.
 
ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे (एसएफआय) ७०० सदस्य जंतर-मंतरकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना अशोक रोड चौकाजवळ रोखण्यात आले. त्यापैकी, अनेकांना ताब्यात घेण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. जंतर- मंतर आणि त्याच्या आसपासच्या परिसरातून ’आप’चे नेते तसेच आयएएसआय, एसएफआय आणि इतर विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांसह सुमारे ५०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले, असे एका अधिकार्‍याने सांगितले.    
 
जंतर-मंतर आणि परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.डीवायएफआय आणि एसएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे एसएफआयच्या सरचिटणीस आयशी घोष यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांना राजधानीतील गुन्हे रोखता येत नाहीत. पण, जेव्हा ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या व्यक्तीच्या संरक्षणाचा प्रश्न येतो, तेव्हा ते रस्त्यावर उतरतात, असे घोष म्हणाल्या.आम्हाला ताब्यात घेतल्याने हे आंदोलन थांबेल, असे त्यांना वाटत असेल. मात्र, ही केवळ सुरुवात आहे, असेही त्या म्हणाल्या.

Related Articles