एमपीएससी सचिव हरपाळकर यांची उचलबांगडी   

मुंबई, (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या आंदोलनापुढे सरकारला अखेर झुकावे लागले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर शुक्रवारी उचलबांगडी करण्यात आली. हरपाळकर यांची आयोगावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीचे, गैरव्यवहाराचे प्रकार उघडकीस आल्यापासून विद्यार्थी आणि तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष असून, एमपीएससीचे अध्यक्ष व सचिवांच्या हकालपट्टीसाठी आंदोलन सुरू आहे. 
 
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी लोकसेवा आयोगाचे सचिव हरपाळकर यांची तात्काळ बदली करण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. त्यानुसार, सामान्य प्रशासन विभागाने हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणणारा निर्णय जारी केला. 
 
राज्य सरकारचे सहसचिव प्रशांत बडगेरी यांनी या बाबतच्या आदेशाचे पत्र प्रसिद्ध केले आहे. हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सचिव या पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती.
 
सहसचिव संवर्गातील अधिकारी असलेले हरपाळकर यांची २२ डिसेंबर २०२५ च्या आदेशाने दोन वर्षांच्या कालावधीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर सचिव म्हणून  प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका फुटल्याने विद्यार्थ्यांनी आयोगाच्या विरोधात आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हरपाळकर यांची बदली करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान,  हरपाळकर यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात करण्यात येतील. हरपाळकर यांनी आयोगाच्या सचिव पदाचा  कार्यभार आयोगाच्या अध्यक्षांच्या संमतीने अन्य अधिकार्‍याकडे तत्काळ सोपवावा, असे सामान्य प्रशासन विभागाने आदेशात म्हटले आहे.
 

Related Articles