इंद्रायणीच्या काठावर अश्रूंचा पूर; विद्यार्थ्यांना अखेरचा निरोप   

दिवेआगर दुर्घटना

आळंदी, (वार्ताहर) : कोकणातील दिवेआगर समुद्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी आळंदीत दाखल होताच इंद्रायणीच्या काठावर अश्रूंचा पूर वाहू लागला. एरवी टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमणार्‍या आळंदीत दिवसभर केवळ आक्रोश आणि अश्रूंचे वातावरण होते.
 
चार रुग्णवाहिकांमधून विद्यार्थ्यांचे पार्थिव सकाळी आठच्या सुमारास आळंदीत आणण्यात आले. आळंदी नगरपरिषदेच्या वतीने अंत्यविधीची तयारी करण्यात आली होती. आळंदी स्मशानभूमीत तन्मय दत्तात्रय वहिले व सुमित भरत आहिरे यांच्या पार्थिवावर सकाळी नऊच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर प्रणव रामदास बनसोडे आणि कैवल्य सतीश वासनकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला. केळगाव येथील स्मशानभूमीत सोहम तुकाराम भांडवलकर आणि राजवीर युवराज वहिले या दोन विद्यार्थ्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
यश किरण वानखेडे याच्यावर अमरावती येथे, तर कौस्तुभ संदीप दौंड याच्यावर राहुरी तालुक्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलांचे पार्थिव पाहून पालकांनी फोडलेला आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. गुरुवारी सकाळी हसतमुखाने घराबाहेर पडलेली मुले पुन्हा कधीच परतणार नाहीत, यावर कुटुंबीयांचा विश्वास बसत नव्हता. खबरदारीचा उपाय म्हणून आळंदी व केळगाव परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सहलीपूर्वी केवळ पालकांकडून संमतीपत्र घेऊन अ‍ॅकॅडमी प्रशासनाने जबाबदारी पार पाडली होती का? समुद्रात विद्यार्थी उतरताना त्यांच्यावर पुरेसे नियंत्रण होते का? तसेच सहलीसाठी आवश्यक परवानग्या घेतल्या होत्या का? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
 
या घटनेमुळे आळंदी पंचक्रोशीवर शोककळा पसरली होती. आळंदी, केळगाव आणि चर्‍होली खुर्द ग्रामस्थांच्या वतीने बंद पाळून विद्यार्थ्यांना शोकाकुल वातावरणात विविध ज्येष्ठांनी श्रद्धांजली अर्पण केली. आळंदी, केळगाव, चर्‍होली खुर्दमध्ये विविध आस्थापनांनी, विविध संस्था, व्यक्ती, पदाधिकारी यांनी बंद मध्ये सहभाग घेत श्रद्धांजली वाहिली.
 

Related Articles