शरद पवार दुष्काळ पाहणीवर पुरंदर तालुक्यात शेतकर्‍यांशी संवाद   

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी पुरंदर तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. तसेच, बांधावर जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.यावेळी शेतकर्‍यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींचा पाढाच पवारांसमोर मांडला. शेती आणि शेती व्यवसायासाठी सहकारी, राष्ट्रीयीकृत तसेच नागरी सहकारी बँकांसह विविध संस्थांकडून घेतलेली कर्जे १०० टक्के माफ करावीत, अशी प्रमुख मागणी शेतकर्‍यांनी केली. तसेच, रोजगार हमीची कामे तातडीने सुरू करून गावांपासून जवळच्या परिसरातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
 
दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. या सर्व मागण्यांबाबत आपण येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, असे आश्वासन पवार यांनी दिले.दरम्यान, पवार यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची स्थिती आहे. फार मोठा शेतकरी वर्ग संकटात आहे. उद्या पाऊस पडला नाही तर काय करायचे? माणसं कशी जगवायची? जनावरांची व्यवस्था काय करायची? हा प्रश्न उभा राहिला आहे. शेतकर्‍यांचे जे थोडं-बहुत पीक आहे ते कसे वाचवता येईल याचा विचार करावा अशी आग्रही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.
 

Related Articles