खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी   

सातारा, (वार्ताहर) : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात शुक्रवारी दुपारीपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण घाटात वाहतूक कोंडी झाली. घाटात विरुद्ध दिशेने येणारा एक टँकर रस्त्यातच उलटल्याने ही कोंडी निर्माण झाली. त्यातच वाहनांची मोठी संख्या पाहता ही परिस्थिती दिवसभर कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
शुक्रवारी गांधी जयंतीची सुट्टी आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमुळे पुणे व मुंबईतून मोठ्या प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडले आहेत. सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने अनेक जण गावी जात आहेत, तर दुसरीकडे पाचगणी, महाबळेश्वर, कास पठार आणि किल्ले रायरेश्वर पठारावर पर्यटकांचा ओघ वाढला आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धात पावसाळ्यानंतर या संपूर्ण पठारांवर विविधरंगी रानफुलांचा बहर आला असून निसर्गाची मखमली चादर पांघरल्याचा नयनरम्य नजारा पाहायला मिळत आहे. हा अद्भूत आविष्कार अनुभवण्यासाठी मुंबई, पुणे, सातारा आणि रायगड येथून पर्यटक मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने महामार्गावरील ताण प्रचंड वाढला आहे.

Related Articles