बेल्ह्यात तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे जंगी स्वागत   

नदीपात्रातून पलंग नेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम

बेल्हे, (वार्ताहर) : पारंपरिक ढोल-ताशांचा कडकडाट, सनईचे मंगलसूर, तोफांची सलामी, फटाक्यांची आतषबाजी, रांगोळ्या आणि फुलांच्या पाकळ्यांच्या पायघड्या...अशा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात घोडेगावहून श्रीक्षेत्र तुळजापूरकडे प्रस्थान केलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या पलंगाचे बेल्हे ग्रामस्थांनी जंगी स्वागत केले. यावेळी संपूर्ण बेल्हे नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती.
 
नवरात्रोत्सवाच्या काळात श्रीक्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात देवीची मूर्ती ज्या पलंगावर विराजमान होते, त्या पवित्र पलंगाचा घोडेगाव ते तुळजापूर असा तब्बल ५५ दिवसांचा पारंपरिक प्रवास सुरू आहे. या प्रवासादरम्यान विविध नदीपात्रांतून पलंग पैलतीरी नेण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही भाविकांकडून श्रद्धेने जपली जात आहे.
 
याच परंपरेचा एक टप्पा पूर्ण करत पलंगाचे बेल्हे येथे आगमन होताच ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने त्याचे स्वागत केले. बेल्हे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक नानासाहेब भुजबळ, शंकर शिंदे, पांडुरंग संगमनेरकर, मयूर गुंजाळ, शिवाजी डुबरे, गोविंद बांगर, विजय सोनवणे, संतोष शिंदे, स्वप्निल हिरवे, प्रकाश भालेराव, डी. एम. पळसकर, मच्छिंद्र लामखडे यांच्यासह परिसरातील महिला-पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बस स्थानकासमोर सामुदायिक महाआरती झाल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या पलंगाची बेल्हे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात ग्रामस्थांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण करत पलंगाचे दर्शन घेतले. या वेळी भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते. उपस्थितांच्या मनोरंजनासाठी विलास अटक आणि संतोष गुळवे यांच्या वाघ्या-मुरळी पार्टीचा सामनाही रंगला.
 
मिरवणुकीनंतर हा पवित्र पलंग गावालगतच्या अंबिका माता मंदिर सभागृहात पारंपरिक पद्धतीने विश्रांतीसाठी विसावला. येथे पाबळे परिवाराच्यावतीने भाविकांसाठी मिष्टान्नाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर परंपरेनुसार बोर्‍हाडे कुटुंबातील सदस्यांनी पलंगाला पुढील मुक्कामाच्या ठिकाणी अळकुटी गावाकडे नेण्याची जबाबदारी पार पाडली.
 
दरम्यान, घोडेगाव ते तुळजापूर या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा नुकताच पार पडला. जुन्नर तालुक्यातील कुमशेत येथून हापूसबागकडे जाताना तुळजाभवानी मातेचा पलंग कुकडी नदीच्या पात्रातून पैलतीरी नेण्यात आला. वाजतगाजत आणि देवीचा जागर करीत भाविकांनी नदीपात्रातील पाण्यातून हा पलंग सुरक्षितपणे पैलतीरी नेला. पाण्याचा प्रवाह, नदीपात्रातील दगडधोंडे आणि घसरणारे मार्ग अशा आव्हानांना सामोरे जात भाविक हा पारंपरिक प्रवास पूर्ण करतात. भवानी मातेच्या आशीर्वादाने हा प्रवास सुरळीत पार पडतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
 

Related Articles