‘साहित्यात राजकारणाचे प्रतिबिंब उमटावे’   

दहावे नांदी संमेलन

सासवड : राजकारण आणि साहित्य यांचा परस्परांशी जवळचा संबंध असून, आचार्य अत्रे यांच्या प्रमाणे राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केले.महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, समर्थ युवा फाउंडेशन, आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान, पुरंदर तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड, सोपाननगर आणि जेजुरी शाखांच्या संयुक्त विद्यमाने दहावे नांदी साहित्य संमेलन ‘राजकीय साहित्य संमेलन’ म्हणून आयोजित करण्यात आले. या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून डॉ. गोर्‍हे बोलत होत्या.
 
डॉ. गोर्‍हे म्हणाल्या, राजकीय साहित्य हा व्यापक विषय आहे. कायदे, ठराव, मसुदे आणि निर्णय घेताना समाजाची पार्श्वभूमी समजून घेणे गरजेचे असते. आज समाजमाध्यमांवर वापरली जाणारी भाषा ही अनेकदा माणसाचा माणसावरील विश्वास कमी करणारी ठरत आहे. त्यामुळे चांगले साहित्य लिहिणार्‍या व्यक्तींवरही काही प्रमाणात बंधने निर्माण होत आहेत. संमेलनादरम्यान साहित्य परिषद पुणे विभागाचे प्रमुख राजन लाखे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
 
साहित्य परिषदेचे अध्यक्ष व संमेलनाचे उद्घाटक योगेश सोमण म्हणाले, शंभराव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आजवर ज्या ठिकाणी साहित्य संमेलने झाली आहेत, त्या ठिकाणी नांदी संमेलन आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहेत. 
 
यावेळी साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विजय कोलते, सासवडच्या नगराध्यक्ष आनंदी जगताप, मसाप सासवड शाखेचे अध्यक्ष दिलीप निरगुडे, प्राचार्य धनाजी नागणे, प्रा. डॉ. नानासाहेब पवार, डॉ. नारायण टाक, शांताराम पोमण, प्रकाश अण्णा खाडे, युसूफ सय्यद, नंदकुमार सागर, प्रा. संदीप टिळेकर, शिवसेना महिला आघाडीच्या अंजली गाडे, ज्योती वाघमारे उपस्थित होते.
 

Related Articles