कमी पावसामुळे बटाटा उत्पादनात घट   

मंचर, (वार्ताहर) : पेठ (ता. आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी विशाल यशवंत तोडकर यांनी एक एकर क्षेत्रात बटाटा पिकाचे उत्पादन घेत खर्च वजा जाता सुमारे ६५ हजार रुपयांचा नफा मिळविला. मात्र, यंदा पुरेसा पाऊस न झाल्याने बटाट्याची फुगवण अपेक्षित प्रमाणात न झाल्यामुळे उत्पादनात घट झाली.
 
तोडकर यांनी अडीच महिन्यांपूर्वी १५ ते ३३ जातीच्या बटाटा बियाण्याची लागवड केली होती. बटाटा बियाणे त्यांनी प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये दराने खरेदी केले. बियाणे, खते, औषधे, मजुरी आदींसाठी एकरी सुमारे ६५ हजार रुपये खर्च झाला. एकरी ५० किलोचे १६ ते १७ कट्टे बियाणे लागले. पावसाची कमतरता असल्याने मायक्रो सिंचनाच्या माध्यमातून पिकाला पाणी देऊन बटाटा पीक जगविण्यात आले. सध्या बटाट्याची काढणी पूर्ण झाली असून ५० किलो बियाण्यांपासून साधारण आठ पिशव्या, प्रत्येकी ५० किलो, असे उत्पादन मिळाले आहे. प्रतवारीनुसार सध्या बटाट्याला १६, १७, १८ व १९ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. समाधानकारक पाऊस झाला असता तर बटाट्याची फुगवण चांगली होऊन उत्पादन व नफा वाढला असता. 
 
यंदा पाऊस कमी असल्याने मायक्रो सिंचनाच्या माध्यमातून बटाटा पीक जगवावे लागले. पावसाचे प्रमाण समाधानकारक असते तर बटाट्याची फुगवण चांगली होऊन उत्पादन आणि नफा निश्चितच वाढला असता. 
 
- विशाल तोडकर, बटाटा उत्पादक, पेठ
 

Related Articles