माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत यंदा दुष्काळाचे भीषण रूप   

सातारा, (वार्ताहर) : जिल्ह्यातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यांत यंदा दुष्काळाने भीषण रूप धारण केले आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे खरीप हंगामाचा पूर्ण खेळखंडोबा झाला असून, शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.जिल्ह्यातील आदर्की, पळशी, वरकुटे-मलवडी, औंध, येळीव, कळंबी या मंडलांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मूग, चवळी, घेवडा यांसारख्या पिकांचा केवळ भुसाच हाती लागल्याचे पीक पाहणीतून स्पष्ट होत आहे. येणार्‍या काही दिवसांत जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होण्याचा धोका असल्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 
धोम-बलकवडी कालव्याचे आवर्तन दीड महिना उशिरा सुटल्याने आदर्की मंडलात हातची पिके गेली आहेत. पळशी परिसरात ४ हजार २५९ हेक्टरवरील पिके करपली आहेत. विहिरींनी तळ गाठला असून, मार्चपासून कूपनलिका बंद आहेत. अनेक ठिकाणी तळी, ओढे-नाले कोरडेठाक आहेत. सोयाबीनला शेंगा लागल्या असल्या तरी त्यात दाणेच भरले नसल्याचे चित्र औंध भागात आहे.
 
या पाश्वर्र्भूमीवर शासनाने ट्रिगर-१ मध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यांचा समावेश करून दुष्काळ जाहीर केला. त्यानंतर प्रशासनाची मोठी धावपळ सुरू झाली आहे. प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह कृषी अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करीत आहेत.सध्या मका, बाजरी कापून जनावरांच्या चार्‍याची व्यवस्था केली जात आहे. मात्र, आणखी काही दिवसांनी स्थिती गंभीर होण्याची भीती शेतकर्‍यांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पेरणीपासून खते, औषधे, मजुरीवर हजारो रुपयांचा खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पुढील हंगामासाठी भांडवल कसे उभे करायचे, हा प्रश्न आहे. पंचनामा केवळ कागदोपत्री न राहता वस्तुनिष्ठ नोंद व्हावी आणि एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, अशी शेतकर्‍यांची भावना आहे.
 

Related Articles