विश्वचषकात भारत-पाकिस्तान तीन वेळा लढतीची शक्यता   

केपटाऊन : भारत आणि पाकिस्तान यांच्यात २०२७च्या वनडे विश्वचषकात १० ऑक्टोबरला सामना होणार आहे. दोन्ही संघ एकाच गटात असून, या स्पर्धेत त्यांच्यात तीन वेळा सामना होण्याची शक्यता आहे. आयसीसीने गुरुवारी वनडे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले. स्पर्धा २ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबरदरम्यान होणार असून, प्रथमच १४ संघ सहभागी होणार आहेत. एकूण ५७ सामने १२ मैदानांवर खेळवले जातील. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या स्पर्धेचे यजमान आहेत.
 
पाकिस्तानला वनडे विश्वचषकात भारताविरुद्ध अद्याप विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही संघ विश्वचषकात आठ वेळा आमनेसामने आले असून, प्रत्येक वेळी भारताने बाजी मारली आहे. विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २३ सामने झाले असून, भारताने १९ सामने जिंकले आहेत. भारताचा पहिला सामना ७ ऑक्टोबरला केपटाऊन येथे २०२३च्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. २०२३च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. 

भारत, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया एकाच गटात

गट ‘अ’मध्ये भारत आणि पाकिस्तानसह ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि यजमान झिम्बाब्वेचा समावेश आहे. गट ‘ब’मध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. दोन्ही गटांत प्रत्येकी एक संघ पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत दाखल होईल.नव्या स्पर्धा पद्धतीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होण्याची शक्यता आहे.  पहिला सामना - गटसाखळी : दोन्ही संघ एकाच गटात असल्याने १० ऑक्टोबरला त्यांची पहिली लढत होईल. दुसरा सामना - सुपर-७ : दोन्ही संघ सुपर-७ फेरीत पोहोचल्यास तेथे त्यांची पुन्हा गाठ पडू शकते.
 
तिसरा सामना - उपांत्य किंवा अंतिम फेरी : सुपर-७ मधील अव्वल चार संघ उपांत्य फेरीत खेळतील. भारत आणि पाकिस्तान या फेरीत पोहोचल्यास किंवा अंतिम फेरीत दाखल झाल्यास त्यांच्यात तिसरा सामना होऊ शकतो.
 

Related Articles