लडाखमधील महत्त्वाची २८ ठिकाणे भारतीय नकाशावर झळकली   

नवी दिल्ली : केंद्रशासित लडाखमधील महत्त्वाची २८ ठिकाणे केंद्र सरकारने ओळख पटवून औपचारिकपणे नकाशावर चिन्हांकित केली आहेत. त्यामध्ये भौगोलिक वैशिष्ट्यांचा समावेश असून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गोगरा अणि गरम पाण्याच्या झर्‍यांचा त्यात समावेश केला  आहे, अशी माहिती भारतीय नकाशा विभागाच्या अधिकार्‍यांनी शुक्रवारी दिली.
 
लडाख केंद्रशासित प्रदेश प्रशासनाशी केंद्र सरकारने याबाबत चर्चा केली. त्यानंतर नकाशावर ठिकाणे ठळकपणे दाखवण्याचा उपक्रम राबविला. याचा उद्देश अधिकृत नकाशा निर्मितीची प्रक्रिया सुव्यवस्थित करणे, ठिकाणांची अचूक ओळख पटवणे आणि संवेदनशील सीमावर्ती भागाबाबत नागरिकांना अधिक चांगल्या प्रकारे जागरुक ॒करणे आहे. सरकारतर्फे प्रकाशित अधिकृत नकाशात ही ठिकाणी भारतीय पाहणी विभागाने दाखवण्यात आली आहेत.
 
दरम्यान, ’गोगरा’ आणि ’हॉट स्प्रिंग’ ही महत्त्वाची सैन्य ठिकाणे आहेत आणि २०२० मध्ये भारतीय व चिनी सैन्यादरम्यान झालेल्या तणावाच्या काळात ही संघर्ष-बिंदू (फ्रिक्शन पॉइंट्स) ठरली होती; तसेच भारतीय सैन्याच्या गस्तीसाठी ही ठिकाणे अत्यंत महत्त्वाची आहेत. पँगोंग त्सो परिसरातील हिंसक संघर्षानंतर ५ मे २०२० रोजी भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये पूर्व लडाख सीमेवर तणाव निर्माण झाला. अखेर दोन्ही बाजूंनी २०२२ मध्ये सैन्य माघारी झाली होती. 

नकाशातील २८ ठिकाणे

अलीशा गिरी (एक उंच शिखर), ब्रांग्सा, चापचिंगल खिंड, कनिष्क शिखर, करुण पीर पर्वत, कुकसेल, मार्तंड गिरी, पारपिक हिमनदी, स्कमरी हिमनदी, शचमिरीक खिंड, श्कोर्गा दरी, झोरावर शिखर, डेहरा कंपास आणि ड्रॅक कार्पो यांचाही समावेश आहे. त्याशिवाय नकाशावर जोल्मोरी, कुमारायन पॉइंट, पांगलुंग, रिंचेन झांगपो, साक्यश्री गिरी, गुरू रिंपोचे, शामल लुंग्पा (१९५० च्या दशकातील गस्त आणि सैन्याच्या हालचालींचा मार्ग), यांग्पा नदी, मारपा लोत्सावा री, मिलारेपा कांग्री, शिव री आणि महेश्वर री यांचीही ओळख पटवून ती चिन्हांकित करण्यात आली आहेत.
 

Related Articles